पहिल्यांदाच हृदय बंद झालेल्या महिलेकडून अवयवदान; काकडे कुटुंबियांनी घेतला पुढाकार
By सुमेध वाघमार | Published: December 3, 2023 06:23 PM2023-12-03T18:23:24+5:302023-12-03T18:23:37+5:30
आतापर्यंत मेंदूच्या मृत्यूनंतर (ब्रेन डेथ) अवयवदान केले जात होते.
नागपूर : आतापर्यंत मेंदूच्या मृत्यूनंतर (ब्रेन डेथ) अवयवदान केले जात होते. परंतु आता आणखी एक मार्ग मोकळा झाला आहे. भारतात हा फारसा प्रचलितही नाही, तो म्हणजे ‘डोनेशन ऑफटर सकर्लेट्री डेथ’ (डीसीडी) म्हणजे हृदय बंद झाल्यानंतर करण्यात आलेले अवयवदान. नागपुरात रविवारी ‘डीसीडी’ अंतर्गत पहिल्यांदा अवयवदान झाले असून भारतात नागपूर हे तिसरे केंद्र ठरले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पुढाकरामुळे हे शक्य झाले आहे.
अयोध्यानगर रहिवासी लीना विनोद काकडे असे अवयवदात्याचे नाव आहे. २९ डिसेंबर रोजी झालेल्या रस्ता अपघातात त्या जखमी झाल्या. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. सुरुवातील काही दिवस एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना नागपूर ‘एम्स’मध्ये दाखल केले. शर्थीच्या उपचारानंतरही प्रकृती खालवत गेली. डॉक्टरांच्या एका पथकाने तपासून त्यांचे ‘ब्रेन डेथ’ झाल्याचे घोषीत केले. याची माहिती त्यांचा कुटुंबियांना देवून अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यांचे पती विनोद, मुलगी मानसी आणि लीना यांचे भाऊ अनिल काळे यांनी अवयवदानाला संमती दिली. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून त्यानुसार गरजू रुग्णाला अवयवदान केले. एम्समधील हे सहावे तर ‘डीसीडी’ अंतर्गत पहिले अवयवदान ठरले.
-एम्सच्या दोन तरुणांना मिळाले नवे जीवन
काकडे यांचे दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याला नातेवाईकांनी मंजुरी दिली. परंतु यकृत वैद्यकीयदृष्ट्या योग्य नव्हते. यामुळे ‘एम्स’मध्येच उपचार सुरू असलेल्या २० आणि ३३वर्षीय तरुणांना मूत्रपिंडाचे दान करून त्यांना नवे जीवन देण्यात आले.
-काय आहे ‘डीसीडी’
‘ब्रेन डेथ’नंतर अवयवदानासठी शरीरातील रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. परंतु काकडे यांच्या प्रकरणात त्यांचे ‘ब्रेन डेथ’ झाल्यानंतर रात्री १२ वाजता त्यांचे हृद्य बंद पडण्याच्या मार्गावर होते. नातेवाईकांकडून अवयवदानाला मंजुरी मिळताच डॉक्टरांनी तातडीने त्यांचे अवयव काढण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेला ‘डोनेशन आॅफटर सकर् ूलेट्री डेथ’ (डिसीडी) म्हणजे शरीरातील रक्तभिसरण थांबल्यानंतर किंवा हृद्याचे ठोके थांबल्यानंतर करण्यात आलेले अवयवदान म्हटले जाते. एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रा. एम हनुमंत राव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या पुढाकारामुळे पहिले ‘डिसीडी’ शक्य झाले.
-रात्री १२ वाजता घेतला ‘डिसीडी’चा निर्णय
लीना काकडे यांच्या ‘ब्रेन डेथ’ची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. त्यांच्याकडून अवयवदानाची संमती मिळाली. याच दरम्यान त्यांचे हृद्य बंद पडण्याचा धोका होता. रात्री १२ वाजता ‘डिसीडी’ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अवयवदान होऊ शकले. ‘डिसीडी’मुळे अवयवदानाच्या प्रक्रियेला गती येवू शकते. ‘लाईव्ह ऑर्गन डोनेशन’ कमी होऊ शकते. -डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक एम्स
‘डिसीडी’ करणारे महाराष्ट्रात पहिले केंद्र
‘यूएसए’ आणि स्पेनमध्ये ‘डिसीडी’ अवयवदानाचे प्रमाण मोठे आहे. भारतात केवळ चंदीगड आणि अहमदाबाद येथे ‘डिसीडी’ अवयवदान होते. आता यात नागपूर ‘एम्स’चा समावेश झाला आहे. ‘डिसीडी’ करणारे राज्यात हे पहिले केंद्र असून देशातील तिसरे केंद्र ठरले आहे. -डॉ. संजय कोलते, अध्यक्ष झेडटीसीसी नागपूर