हृद्य बंद पडलेल्या एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, दु:खातही वडिलांचा मानवतेचा विचार; देहदान करून ठेवला आदर्श
By सुमेध वाघमार | Published: April 7, 2024 06:02 PM2024-04-07T18:02:21+5:302024-04-07T18:02:37+5:30
विशेष म्हणजे, एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यूचा दु:खात वडिल असतानाही त्यांनी मानवतेचा विचार करीत अवयवदानासोबतच देहदानही केले. समाजासमोर एक आदर्श ठेवला.
नागपूर : उपचारादरम्यान मेंदू मृत्यू (ब्रेन डेथ) झाल्यानंतरच नातेवाइकांच्या संमतीनंतर अवयवदान करता येते. आता ‘डोनेशन आॅफटर सकर् ूलेट्री डेथ’ (डीसीडी) म्हणजे हृद्य बंद झाल्यानंतर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवून अयवदान करण्यालाही मान्यता मिळाल्याने याचा फायदा अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणाºया रुग्णांना होत आहे. रविवारी नागपूरच्या ‘एम्स’मध्ये दुसरे ‘डिसीडी’ अंतर्गत अवयवदान करण्यात आले. विशेष म्हणजे, एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यूचा दु:खात वडिल असतानाही त्यांनी मानवतेचा विचार करीत अवयवदानासोबतच देहदानही केले. समाजासमोर एक आदर्श ठेवला.
बेलतरोडी नागपूर येथील रहिवासी प्रतिक सापरे (२६) असे अवयवदात्याचे नाव. प्रतिकने ‘बीसीसीए’चे शिक्षण घेतले होते. त्याला ६२वर्षी आई व ६६वर्षीय वडील विजय आहे. विजय सापरे हे खासगी नोकरी करतात. प्रतीकही नोकरीच्या शोधात होता. त्याची प्रकृती बरी नसल्याने १२ दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळात दाखल केले. उपचार सुरू असतानाच त्याला हृद्य विकाराचा झटका आला. ‘सीपीआर’ देण्यात आले. प्रकृती गंभीर होत असलेली स्थिती पाहून त्याला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. इथे डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले. परंतु प्रतिक उपचाराला प्रसिताद देत नव्हता. ६ एप्रिल रोजी रात्री ११.१२ वाजता त्याचे हृद्य बंद पडले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हृद्य बंद पडल्यानंतरही अवयव दान होऊ शकते, असे समुपदेशन कुटुंबाला करण्यात आले.
एकुलत्या एक मुलाचा मृत्यूचे डोंगरा एवढे दु:ख असतानाही त्याचे वडिल विजय सापरे यांनी अवयवदानाला संमती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी ‘एम्स’ला मुलाचे देहदान केले. दरम्यान, ही माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या पुढाकारात प्रत्यारोपण समन्वयक मनीष मंडपे यांनी पुढील अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
-दोन महिलेला मिळाले नवे आयुष्य
प्रतिककडून दान झालेल्या पहिल्या किडनीचे ‘एम्स’मध्ये भरती असलेल्या ४६ वर्षीय महिलेवर तर दुसरी किडनीचे याच रुग्णालयातील ३० वर्षीय महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले. कॉर्निआ एम्सच्या नेत्रपेढीला दान करण्यात आले. ही प्रक्रिया ‘एम्स’चे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या पुढाकारात डॉ. अमोल भावने, डॉ. चंद्रकांत मुंजेवार, डॉ. संजय कोलते, डॉ. सुचेता मेश्राम व डॉ. उदीत नारंग यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.
-वृत्तपत्रातून अयवदानाची माहिती मिळाली
वडिल विजय सापरे म्हणाले, अयवदानाविषयी वृत्तपत्रातून बातम्या वाचल्या आहेत. ‘डीसीडी’बद्दलही वाचले होते. जेव्हा मला कळविण्यात आले की, मुलाचे हृद्य बंद पडले आहे आणि अवयव दान करून त्याला अवयवरूपी जीवंत ठेवता येते, तेव्हा मी होकार दिला. सोबतच मुलाचे शरीर वैद्यकीय शिक्षणाकरीता दानही केले.