चंद्रपूरच्या महिलेचे नागपुरात अवयवदान, पतीच्या पुढाकाराने तिघांना जीवनदान

By सुमेध वाघमार | Published: December 29, 2023 06:25 PM2023-12-29T18:25:57+5:302023-12-29T18:26:58+5:30

‘एम्स’ने सर्व शासकीय रुग्णालयांना मागे टाकत आतापर्यंत सर्वाधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.

Organ donation of Chandrapur woman in Nagpur, life donation to three people at the initiative of her husband | चंद्रपूरच्या महिलेचे नागपुरात अवयवदान, पतीच्या पुढाकाराने तिघांना जीवनदान

चंद्रपूरच्या महिलेचे नागपुरात अवयवदान, पतीच्या पुढाकाराने तिघांना जीवनदान

नागपूर : घरी काम करीत असताना एका महिलेला अचानक भोवळ येऊन खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी या महिलेला चंद्रपूरहून नागपुरात आणले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषीत केले. त्या दु:खातही त्यांच्या पतीने अवयवदानासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान मिळाले. या वर्षातील हे ३५वे अवयवदान होते. 

वंदना सुत्रपवार (४६) रा. सावली चंद्रपूर, त्या महिला अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सुत्रपवार घरी काम करीत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्या खाली पडल्या. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्याचे निदान झाले. तीन दिवसाच्या उपचारानंतरही प्रकृती खालवत असल्याचे पाहत त्यांना नागूपरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हलविण्यात आले. येथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाले. ‘एम्स’च्या समन्यवक प्रीतम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. महिलेचे पती दिपक सुत्रपवार यांनी अवयवदानास संमती दिली. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीने दोन्ही मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्नियाचे दान के ले. या अवयवदानात ‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. उदित नारंग, डॉ. भरतसिंग राठोड, डॉ. सौरभ झांबरे व डॉ. सुचेता मेश्राम यांचे विशेष योगदान होते. 

‘एम्स’चे १२वे मूत्रपिंड प्रत्यारोपण
‘एम्स’ने सर्व शासकीय रुग्णालयांना मागे टाकत आतापर्यंत सर्वाधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. शुक्रवारी ३४ वर्षीय तरुणावर १२वे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. या शिवाय, अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलच्या ५९ वर्षीय पुरुष रुग्णावर दुसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण तर, न्यू इरा हॉस्पिटलच्या ४७ वर्षीय पुरुषावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.

Web Title: Organ donation of Chandrapur woman in Nagpur, life donation to three people at the initiative of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.