नागपूर जिल्ह्यातील शेतमजुराच्या मुलाचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:14 PM2018-12-03T13:14:52+5:302018-12-03T13:16:38+5:30

रविवारी एका मेंदू मृत (ब्रेन डेड) तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून तिघांना जीवनदान दिले. विशेष म्हणजे, शेतमजूर असलेल्या तरुणाच्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले.

The organisms of a farming child in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील शेतमजुराच्या मुलाचे अवयवदान

नागपूर जिल्ह्यातील शेतमजुराच्या मुलाचे अवयवदान

Next
ठळक मुद्देबोपचे कुटुंबीयांचा पुढाकार यकृत, मूत्रपिंडदानाने तिघांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे रविवारी एका मेंदू मृत (ब्रेन डेड) तरुणाचे यकृत, दोन्ही मूत्रपिंड दान करून तिघांना जीवनदान दिले. विशेष म्हणजे, शेतमजूर असलेल्या मेंदू मृत (ब्रेन डेड) तरुणाच्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले.
सतीश नारद बोपचे (२७) त्या दात्याचे नाव. सतीशचा मामा हेमराज रहागंडाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सतीशचे वडील नारद बोपचे यांना मोठी मुलगी आणि सतीश अशी दोनच मुले. सतीश हा मौदा येथील एका खासगी कंपनीत क्रेन चालविण्याचा काम करायचा. घरातील परिस्थिती बेताचीच असल्याने सतीशवर आर्थिक जबाबदारी होती. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता काम संपवून कंपनीतून वडोदा येथील भाड्याच्या घरी जात असताना वाटेत त्याचा अपघात झाला. पोलिसांनी त्याला तातडीने लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये आणले. याच दरम्यान सतीशच्या फोनवर त्याचा वडिलांचा फोन आल्याने पोलिसांनी अपघाताची माहिती दिली.
हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती, डॉ. पराग मून, डॉ. अमोल कोकास, डॉ. साहिल बन्सल यांनी सलग तीन दिवस सतीशच्या उपचारात शर्थीचे प्रयत्न केले. परंतु शनिवार १ डिसेंबर रोजी मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती डॉक्टरांनी बोपचे कुटुंबीयांना दिली, सोबतच अवयवदानाचा सल्लाही दिला. एकुलता एक मुलगा सोडून गेल्याच्या दु:खाने त्याच्या आईला मोठा धक्का बसला.
वडील शेतमजूर असताना त्यांना अवयवदानाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, असेही रहागंडाले यांनी सांगितले. अवयवदानासाठी कुटुंबीयांकडून होकार मिळताच डॉक्टरांनी याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन सेंटर, (झेडटीसीसी) नागपूरला दिली. या सेंटरच्यावतीने अवयवदानाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

४० वे अवयवदान
‘झेडटीसीसी’च्या विशेष प्रयत्नामुळे नागपुरातील हे ४० वे अवयदान व प्रत्यारोपण पार पडले. सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी, मूत्रपिंड प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. सी.पी. बावनुकळे, ‘रिट्रायव्हल अ‍ॅण्ड ट्रान्सप्लँन्टेशन कॉर्डीनेटर’ वीणा वाठोरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The organisms of a farming child in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.