शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी संघटना आक्रमक
By admin | Published: October 7, 2016 02:59 AM2016-10-07T02:59:51+5:302016-10-07T02:59:51+5:30
विना अनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर औरंगाबाद येथे झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे पडसाद उमटले आहे.
उपसंचालकांच्या कार्यालयापुढे धरणे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कारवाईची मागणी
नागपूर : विना अनुदानित शिक्षकांच्या मोर्चावर औरंगाबाद येथे झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे पडसाद उमटले आहे. नागपूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुरुवारी शिक्षक संघटनांनी आंदोलन करून, जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना राजीनाम्याच्या मागणीसाठी निवेदन दिले.
काळ्या फिती लावून निषेध
हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारतीच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध केला. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात घोषणा देऊन शासनाचा निषेध करण्यात आला. संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षक उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप तडस, संजय खेडीकर, सपन नेहरोत्रा, भरत रेहपाडे, किशोर वरभे, दीपक नागपुरे, देवीदास नंदेश्वर, लक्ष्मीकांत बावनकर उपस्थित होते.
उपसंचालक कार्यालयापुढे निषेध
शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांवर हल्ले करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे धिक्कार करण्यात आला. यावेळी विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, प्रवीण गजभिये, विजय बोरकर, किशोर जुवार, जितेंद्र महेशकर, सतीश झाडे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेपुढे धरणे
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे जिल्हा परिषदेपुढे काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
हल्ल्याच्या विरोधात निषेध सभा
औरंगाबाद येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस शिक्षक सेलतर्फे उपसंचालक कार्यालयापुढे निषेध सभा घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील या दुर्भाग्यपूर्ण घटनेला जबाबदार असणारे विभागीय आयुक्त अमितेशकुमार व अन्य अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून, न्यायाधीशामार्फत त्यांची चौकशी व्हावी. तसेच शिक्षण विभागाचे प्रमुख या नात्याने शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम पंचभाई, जयंत जांभुळकर, बाळा आगलावे, सतीश दामोधरे, तुकाराम इंगळे, सिद्धार्थ ओंकार, अजहर हुसैन उपस्थित होते.