विवाह समारंभात अवयवदानाचा संकल्प
By Admin | Published: March 26, 2017 01:52 AM2017-03-26T01:52:58+5:302017-03-26T01:52:58+5:30
लग्न म्हणजे दोन जीवांसह दोन कुटुंबाचे मनोमीलन. उत्साहाचा, आनंदाचा क्षण. मात्र या उत्साह व मौजमजेसोबतच सामाजिक दृष्टिकोन जपण्याचा प्रयत्न एका नवदाम्पत्याने चालविला आहे.
नवदाम्पत्याचा पुढाकार, वऱ्हाडीही तयार : कामठी रोडवर रंगणार अनोखा विवाह
निशांत वानखेडे नागपूर
लग्न म्हणजे दोन जीवांसह दोन कुटुंबाचे मनोमीलन. उत्साहाचा, आनंदाचा क्षण. मात्र या उत्साह व मौजमजेसोबतच सामाजिक दृष्टिकोन जपण्याचा प्रयत्न एका नवदाम्पत्याने चालविला आहे. विवाहबंधनात अडकणारे योगेश वनकर आणि प्रियंका बागडे हे नवदाम्पत्य विवाह समारंभातच अवयवदानाचा संकल्प घेणार आहे. त्यांच्या पुढाकाराने लग्नात सहभागी होणारे कुटुंबीय आणि २५ ते ३० वऱ्हाडी एकाच वेळी अवयवदानाची नोंदणी करणार आहेत. कामठी रोडवरील रॉयल सभागृहात २६ मार्चला सकाळी ११.३० वाजता हा अनोखा विवाह सोहळा पार पडणार आहे.
या विवाहातील नियोजित वर म्हणजे योगेश वनकर हा मूळचा गडचिरोली येथील. चार वर्षांपासून नागपुरात राहत असून एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नियोजित वधू प्रियंका बागडे ही समाजसेवा विषयात स्नातकोत्तर झालेली. योगेश हा पदवी अभ्यासक्रमापासूनच अवयवदानाचा विचार करीत होता. मात्र आपल्या संकल्पाला सामाजिक स्वरूप मिळावे अशी त्याची इच्छा. त्यासाठी त्याने स्वत:च्या विवाहात हा संकल्प घेण्याचा निर्णय घेतला. आपला विचार त्याने घरच्यांना सांगितला व त्यांनाही तो पटला. मुलगी पसंत केल्यावर प्रियंकालाही त्याने हा संकल्प सांगितला. प्रियंका स्वत: सामाजिक दृष्टिकोन जपणारी. त्यामुळे तिने नुसता होकारच दिला नाही तर स्वत:ही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. याचवेळी विवाहात येणाऱ्या पाहुण्यांना रोपटे भेट देण्याची इच्छा तिने व्यक्त केली आणि दोघांनी ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. वधू-वराच्या संकल्पामुळे प्रभावित झालेल्या दोन्ही कुटुंबाच्या लोकांनी या सामाजिक कार्यात सहभाग घेऊन अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे कुटुंब व मित्रमंडळी मिळून २२ लोकांनी अवयवदानासाठी नोंदणी केल्याचे योगेश वनकर याने सांगितले. लग्नात येणारे वऱ्हाडीही या सामाजिक कार्यात सहभाग घेतील, असा विश्वास त्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
असा होणार विवाह
भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचून या विवाह समारंभाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर बौद्ध पद्धतीने लग्न लागल्यानंतर विवाहात आलेल्या पाहुण्यांना पर्यावरणाला उपयुक्त अशी झाडे भेटी दिली जातील. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातीप्रथांचे उन्मुलन’ हा ग्रंथ भेट म्हणून दिला जाणार असल्याची माहिती योगेश वनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मेडिकलची टीम उपस्थित राहणार
विवाहापूर्वी २२ लोकांनी अवयवदानाची नोंदणी केली आहे. याशिवाय अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केली असल्याचे योगेश यांनी सांगितले. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून, त्यांची टीम विवाह समारोहाच्या वेळी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आलेल्या वऱ्हाड्यांची जागृती करण्यात येईल आणि त्याच ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनाही दिले निमंत्रण
या अनोख्या विवाहाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याचे योगेश यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वेळेत शक्य झाल्यास ते विवाहाला उपस्थित राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.