नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे २४ व २५ ला आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:24 AM2018-02-22T10:24:45+5:302018-02-22T10:29:06+5:30
नागपुरात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. वि. स. जोग हे संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहेत. आयोजन समितीच्या कांचनताई गडकरी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल येथे आयोजित साहित्य संंमेलनाचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उदघाट्न करण्यात येईल. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या संमेलनाचे उदघाट्न करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित राहतील. तत्पूर्वी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. स्वा. सावरकरांच्या विचारातील सार्थकतेचा शोध घेऊन नव्या भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा घेण्यास्तव हे दोन दिवसीय वाड्मयीन विचारमंथन होणार असल्याचे त्या म्हणाल्या. दुपारी २ वाजता ‘सावरकरांचे वाड्मयविश्व’ या परिसंवादाने विचारमंथनाला सुरुवात होणार आहे.
प्रसिद्ध साहित्यिक व कलावंत डॉ. वीणा देव या परिसंवादाच्या अध्यक्ष राहणार असून प्रकाश एदलाबादकर, डॉ. श्याम धोंड व तीर्थराज कापगते हे विचार मांडतील. त्यानंतर ‘एकात्मता, समरसता व सावरकर’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाची मैफिल सजणार आहे.
२५ फेब्रुवारीला प्रेरणा लांबे यांच्या ‘मी येसू बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाने दुसऱ्या दिवशीचे सत्र सुरू होईल. त्यानंतर विविध विषयावर परिसंवाद होतील. यादरम्यान शिवकथाकर विजयराव देशमुख यांचा सत्कार करण्यात येईल. प्रा. विवेक अलोणी यांनी संपादन केलेल्या ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे विमोचन करण्यात येणार असल्याचे कांचन गडकरी यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव डॉ. अजय कुळकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थित होते.