बनावट कूपन घेतल्याच्या रागापायी मेळाव्याच्या आयोजकांनी अल्पवयीन मुलांना केली रात्रभर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 10:32 PM2022-04-11T22:32:36+5:302022-04-11T22:33:10+5:30
चेट्रीचंड मेळाव्याची बनावट कूपन्स घेतल्याच्या कारणावरून या मेळाव्याचे आयोजक विकी कुकरेजा यांनी अल्पवयीन मुलांना रात्रभर डांबून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपुरातील नेते नगरसेवक विकी कुकरेजा यांनी साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन बालकांना रात्रभर मारहाण केल्याची संतापजनक घटना चर्चेला आली आहे. कुकरेजा आणि साथीदाराच्या अमानुषतेमुळे एका मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यानंतर पीडित पालकाने सोमवारी रात्री जरीपटका ठाण्यात धाव घेतली.
कैलास कुकरेजा असे पीडित पालकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २, ३ व ४ एप्रिल रोजी चेट्रीचंड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या फूड स्टॉल्सवर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कूपन छापून विकण्यात आले होते. कुकरेजा यांचा कार्यकर्ता असलेल्या रोहित आहूजाने अधिकृत अन् मोठ्या प्रमाणात अनधिकृत (बनावट) कूपन छापून ते विकले होते. परिसरातील २३ मुलांनी आहूजा याच्याकडून हे बनावट कूपन विकत घेत स्टॉलवर हजेरी लावली. त्यांच्याकडचे कुपन बनावट असल्याचे लक्षात आल्याने कुकरेजा आणि त्याच्या साथीदारांनी ते खूपच गांभिर्याने घेतले.
३ एप्रिलच्या रात्री १२ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळी त्या मुलांना आणि पालकांना दयानंद पार्कमध्ये बोलवले आणि त्यांना अमानुष मारहाण केली. सर्वांसमोर घाणेरड्या शिव्याही घालण्यात आल्या. पैसे देऊन कूपन घेतल्याचे सांगूनही ते ऐकायला तयार नव्हते. या घडामोडीमुळे जरीपटक्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कुकरेजा यांची प्रचंड दहशत असल्याने कुणीही उघडपणे बोलत नव्हते. मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असा समज आल्याने कुणी पोलिसांकडे जायला धजावले नाही. दरम्यान, अनेकांसमोर झालेल्या या अपमानामुळे कैलाश केवलरमानी यांच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोमवारी केवलरामानी आपली व्यथा मांडण्यासाठी पत्रकारांकडे पोहचले आणि तेथून या घटनेचा बोभाटा झाला.
२०० चे १० हजार मागितले
आहूजाकडून २३ मुलांनी कूपन विकत घेतले. कुणी २००, कुणी १५०० तर कुणी दोन हजारांचे कुपन घेतले. विकी कुकरेजा आणि साथीदारांनी एकूण २३ मुुलांना त्यांच्या पालकांसह पार्कमध्ये बोलवून पोलिसांकडून गुन्हेगारांचा जसा कस्टडी रिमांड (पीसीआर) घेतला जातो त्याहीपेक्षा वाईट पद्धतीने या मुलांची कस्टडी घेतली. २०० रुपयांचे कुपन घेणाऱ्याला चक्क १० हजार रुपये मागितले.
छळ असह्य, पोलिसांकडे धाव
कुकरेजा आणि त्यांच्या साथीदारांकडून अपमाण, छळ अन् धमक्या दिल्या जात असल्याने अखेर यातील तीन मुले त्यांच्या पालकांसह सोमवारी रात्री जरीपटका ठाण्यात पोहचली. त्यांनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे तक्रार दिली. आम्हाला न्याय द्या, अशी केविलवाणी मागणी ते करीत होते.
यांच्यावर केला मारहाणीचा आरोप
विकी कुकरेजा,सतीश आनंदानी,राजेश बटवानी,रवि जेस्वानी,संजय वासवानी,हितेश दवानी,अमर मायानी,जगदीश वंजानी,मंशानी,जतिन मेठवानी व विराग गोधानी,विकी अालवानी,मुकेश साधवानी.