नागपूर विद्यापीठ मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:13 AM2018-01-05T10:13:31+5:302018-01-05T10:14:06+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले हे या महोत्सवाचे उद्घाटन करतील, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दिली.
यासंदर्भात नागपूर विद्यापीठात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रपरिषदेला माजी विभागप्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते. ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता गुरू नानक भवन येथे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात होईल.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम उपस्थित राहतील. यावेळी माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ विचारवंत-समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांचा अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सत्कार करण्यात येईल तसेच माजी विद्यार्थ्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येईल.
सायंकाळी ५ वाजता डॉ. रमेश अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ते दिवस...ते क्षण’ या कार्यक्रमाचे आयोजन होईल. यात डॉ. राजन जयस्वाल, डॉ. हेमंत खडके, डॉ. अलका गायकवाड, डॉ. देवानंद सोनटक्के हे उपस्थित राहतील.
हीरक महोत्सवाचाच एक भाग म्हणून रविवार, ७ जानेवारी २०१८ ला सकाळी ९.३० वाजता ‘मराठी भाषा : संरक्षणाच्या व संवर्धनाच्या दिशा’ या विषयावर ग्रामगीता भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सुविख्यात अभ्यासक प्रा. हरी नरके हे चर्चासत्राचे अध्यक्ष राहतील. तर सकाळी ११.३० वाजता ‘अभिजात मराठी भाषा : प्राचीनता, अखंडता व श्रेष्ठता’ या विषयावर डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. मोना चिमोटे यांच्या उपस्थितीत परिसंवाद होईल. तर दुपारी २.३० वाजता ‘सद्य:कालीन मराठी भाषा : स्वरूप व विकासाच्या दिशा’ या विषयावर प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. विद्या देवधर, सूचिकांत वनारसे यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.