नागपुरात २० डिसेंबरपासून महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन; राज्यभरातील पदार्थांचे ४० स्टॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:39 PM2017-12-15T21:39:57+5:302017-12-15T21:44:06+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २५ डिसेंबरपर्यंत सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महोत्सवात राज्यभरातील प्रसिद्ध व्यंजनांचे ४० स्टॉल्स राहणार असून एक लाखावर नागरिक महोत्सवाचा लाभ घेतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे. गेल्यावर्षी सुमारे ६० हजार नागरिकांनी महोत्सवातील स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेतला होता.
पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील खाद्य पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या पदार्थांची लोकप्रियता आणखी वाढावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवामध्ये कोकणातील माशांचे विविध प्रकार, मालवणमधील कोंबडी वडे, मटण करी, खान्देशातील भरली वांगी, शेव भाजी, विदर्भातील सावजी, वडा पाव, पोहे इत्यादी पदार्थांचे स्टॉल्स राहणार आहेत असे येरावार यांनी सांगितले.
महोत्सवाचे औचित्य साधून अमरावती-यवतमाळ-वणी खाण पर्यटन सहलीची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, बोदलकसा या पर्यटनस्थळाची ओळख करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी भव्य धरण व अन्य आकर्षक स्थळे आहेत. हे ठिकाण नागपूरपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. महोत्सवादरम्यान मराठी गायिका सावनी रवींद्र यांचा कार्यक्रम, एलएडी महाविद्यालयाचा फॅशन शो, लावणी नृत्य, रॉक शो, लोकनृत्य इत्यादी कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत याकडे येरावार यांनी लक्ष वेधले.
पत्रकार परिषदेत पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, महाव्यवस्थापक स्वाती काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, सचिव ज्योत्स्ना पंडित आदी उपस्थित होते.
राज्यात टुरिझम कॅरिडॉर
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात टुरिझम कॅरिडॉर तयार करण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती येरावार यांनी दिली. पर्यटनस्थळी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील व राज्यातील पर्यटनस्थळांचे जगभर ब्रॅन्डिंग करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.