‘कोरोना’मुळे अनाथाश्रम, वृद्धाश्रम अस्वस्थ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 01:56 PM2020-09-10T13:56:00+5:302020-09-10T13:57:36+5:30
एकीकडे दानदात्यांकडून येणारी मदत थांबली असून दुसरीकडे या संस्थांमध्ये साजरे होणारे आनंदी कार्यक्रमही बंद झाले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करताना संवेदनशील नागरिकांकडून मिळणारा आनंदही हिरावला गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. सतत वाढणाऱ्या आजाराने समाजमन सुन्न झाले आहे. अशा परिस्थितीत समाजाच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असलेले अनाथाश्रम व वृद्धाश्रमांवर एक प्रकारची अवकळा आली आहे. एकीकडे दानदात्यांकडून येणारी मदत थांबली असून दुसरीकडे या संस्थांमध्ये साजरे होणारे आनंदी कार्यक्रमही बंद झाले आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करताना संवेदनशील नागरिकांकडून मिळणारा आनंदही हिरावला गेला आहे.
श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथाश्रमाच्या समाजसेविका प्रतिमा दिवानजी यांच्याकडून तेथील स्थितीची माहिती घेतली. या अनाथाश्रमात सध्या २० निराधार महिला, बालके आणि मुली मिळून १२० जण निवासाला आहेत. पूर्वी अनाथाश्रमामध्ये सातत्याने कार्यक्रम व्हायचे. संवेदनशीन लोक, तरुण त्यांचे वाढदिवस किंवा इतर आनंदाचे सोहळे अनाथाश्रमात येऊन साजरे करायचे. सण उत्सव असला की अनेकांच्या घरून खाद्यपदार्थ, फराळ यायचे. सकाळचा नाश्ता, जेवण हे सतत मुलांना मिळत होते. महिन्यातील १५-२० दिवस अशा कार्यक्रमांनी अनाथाश्रमाच्या तारखा बुक असायच्या. मात्र कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हे सर्व कार्यक्रम बंद झाले. दानदात्यांची संख्याही बरीच घटली आहे. उमरेड रोडवर असलेल्या पंचवटी वृद्धाश्रमाचे गेटच गेल्या पाच महिन्यांपासून बंद झाले आहे.
काहीच दानदात्यांचा मदतीचा हात
आनंद इंगोले यांच्या विमलाश्रमाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या विमलाश्रमातील ४० मुलांना मदतीची अत्यंत गरज असल्याचे इंगोले यांनी सांगितले. शासकीय अनुदानाविना चालणाºया विमलाश्रमाच्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.