अनाथाच्या मदतीसाठी सरसावले अनाथांचे हात

By Admin | Published: May 13, 2017 02:34 AM2017-05-13T02:34:38+5:302017-05-13T02:34:38+5:30

अनाथांना कुणी वाली नसतो. ना आई, ना वडील, ना कुणी नातेवाईक. जीवाला दुखले-खुपले तरी रडत वेदना सहन कराव्या लागतात.

Orphans' hands to help orphans | अनाथाच्या मदतीसाठी सरसावले अनाथांचे हात

अनाथाच्या मदतीसाठी सरसावले अनाथांचे हात

googlenewsNext

जगावेगळा आदर्श : प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातील संस्काराचे विधायक दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनाथांना कुणी वाली नसतो. ना आई, ना वडील, ना कुणी नातेवाईक. जीवाला दुखले-खुपले तरी रडत वेदना सहन कराव्या लागतात. असा कुणी सापडत नाही जो मायेने उपचाराची सावली धरेल त्या आजारावर. परंतु प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून माणुसकीच्या नात्याचा जगावेगळा आदर्श उभा केला आहे. आपल्याच एका अनाथ सहकाऱ्याच्या उपचारासाठी या अनाथांनी पुढाकार घेतला असून विविध संस्थांमधून निधी उभारत एका अनाथाचे पालकत्व स्वीकारले आहे.

रेल्वेस्थानकावर भटकंती करणाऱ्या मुलांची प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर ही शाळा महापालिकेच्या मदतीने सुरू आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरात भटकंती करणारी मुले एक मेकांच्या आधाराने येथे संस्काराचे, शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या मुलांमध्येच गणेश कुमरे हा मुलगासुद्धा वास्तव्यास आहे. त्याला तोंडाचा आजार झाला असून, डॉक्टरांनी आॅपरेशन सांगितले आहे. लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. हाच निधी उभारण्यासाठी त्याचे सहकारी पुढे आले असून आपल्या मित्राच्या मदतीसाठी त्यांच्या मनात निर्माण झालेली कर्तव्याची भावना या ज्ञानमंदिरात मिळणाऱ्या शिक्षण आणि संस्कारामुळेच आली आहे.
प्लॅटफॉर्मवर भटकणारे, दोन वेळच्या अन्नासाठी वाट्टेल ते करणारे, आईवडिलांपासून दुरावलेल्या बालकांना जेव्हा संस्काराचे व्यासपीठ मिळते तेव्हा अशा बालकांकडून काही सत्कर्मही घडते. हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. गणेश हा २०१४ मध्ये येथे आला होता. गणेशच्या स्वभावामुळे येथील मुलांचा तो जीवलग झाला. परंतु त्याला बालपणापासून तोंडाचा आजार आहे.

त्याला इतर मुलांसारखे खायला जमत नाही. हळूहळू आजार आणखी वाढतोय, प्रकृती खालावतेय. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला दिला आहे. यासाठीचा खर्च या अनाथाला न झेपणारा आहे. म्हणूनच त्याचे सहकारी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडे जाऊन गणेशला मदत करण्याची विनंती करीत आहेत. गणेश अभ्यासात हुशार असून यंदा त्याचे दहावीचे वर्ष आहे. आजारातून मुक्त होऊन त्याला परीक्षेची तयारी करता यावी म्हणून त्याच्या सहकाऱ्याची ही धडपड सुरू आहे.

 

Web Title: Orphans' hands to help orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.