...अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू ! नागपुरातील धमकीपत्राने सुरक्षा यंत्रणेत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:00 PM2019-07-08T23:00:42+5:302019-07-08T23:02:20+5:30
आमच्याकडे शार्पशूटर आणि हल्लेखोरांची फौज आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या तसेच खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी लिहिलेली पत्रके अमरावती मार्गावरील कॅम्पससमोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी लावलेली आढळली. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमच्याकडे शार्पशूटर आणि हल्लेखोरांची फौज आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या तसेच खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी लिहिलेली पत्रके अमरावती मार्गावरील कॅम्पससमोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी लावलेली आढळली. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
कॅम्पससमोर असलेल्या बसस्थांब्यावर आजूबाजूला तीन पत्रके चिकटवली होती. सोमवारी सकाळी एका सजग प्रवाशाच्या ते निर्दशनास आले. त्याने आजूबाजूच्यांना आणि पोलिसांना सूचना दिली. त्यानुसार, अंबाझरी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी ती पत्रके ताब्यात घेतली.
‘विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या, खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, शासकीय कर्मचाऱ्यांनो आळस सोडून काम करा, आरक्षण सर्वांना संपवेल.’ असे या पत्रकात लिहिलेले आहे. हा इशारा गांभीर्याने घेतला नाही तर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल. आमच्याकडे शार्पशूटर व हल्लेखोरांची फौज आहे. यमराज की उंगली रिमोट पर है,’ असा धमकीवजा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. पोलिसांनी ती पत्रके जप्त केली असून बसथांब्यावर ही पत्रके कुणी लावली, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एखाद्या विद्यार्थ्याने किंवा बेरोजगार तरुणाने ही पत्रके लावली असावी, असा अंदाज त्यांनी ऑफ द रेकॉर्ड व्यक्त केला. या संबंधाने चौकशी सुरू असून ही धमकी पत्रके लावणाऱ्याला लवकरच आम्ही अटक करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एटीएसचे पथकही पोहचले
बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीची पत्रके मिळाल्याचे कळताच येथील दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ही सतर्क झाले आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहचून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या पत्रकांबाबत माहिती घेतली. बसथांब्याची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्यात आले. आजूबाजूच्या हातठेलेवाले, दुकानदार यांच्याकडेही चौकशी केली. ही पत्रके बस थांब्यावर कुणी लावली, त्याचा पोलिसांसोबत एटीएसचे पथकही समांतर तपास करीत आहे.