आमचा जाहीरनामा; सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या हाताला हवे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:52 AM2019-03-19T11:52:53+5:302019-03-19T11:53:17+5:30
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे अशी अपेक्षा इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे अशी अपेक्षा इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली यांनी व्यक्त केली आहे.
पीडब्ल्यूडी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या बांधकामाच्या ३३ टक्के कामे ही नियमानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणे अपेक्षित आहे. ही कामे मिळविण्यासाठी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांची पीडब्ल्यूडीमध्ये नोंदणी करावी लागते. आजच्या घडीला जिल्ह्यात सात हजार तर संपूर्ण महाराष्ट्रात ७२ हजार सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत आहे. पूर्वी २० लाख रुपयांपर्यंत विना निविदा काम सुशिक्षित बेरोजगारांना मिळायचे.पण ही मर्यादा आता तीन लाख करण्यात आली आहे. त्यातही आता काम मिळणे अवघड झाले आहे. गेल्या २८ महिन्यात पीडब्ल्यूडीमध्ये एक लॉटरी निघाली. त्यातही फक्त १९ काम देण्यात आले. अशीच अवस्था जिल्हा परिषदेची आहे. आज सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो आहे. सुशिक्षित बेरोजगाराच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यापासून तर झालेल्या कामाचे देयके काढण्यापर्यंत भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो आहे. केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी लालफितशाहीत एक एक वर्ष लागते. तीन लाखापर्यंतची अट टाकल्याने एक प्रकारे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्यायच केला आहे. प्रत्येक महिन्यात अधिक्षक अभियंता, तीन महिन्यात मुख्य अभियंता यांसोबत सुशिक्षित बेरोजगाराच्या बैठका होऊन त्यांच्या समस्या सोडविण्याची गरज आहे. पण त्या होत नाही. शासन निर्णयानुसार पीडब्ल्यूडीमध्ये महिन्यातून एकदा व जि.प.मध्ये १५ दिवसांतून एकदा लॉटरी काढून काम वाटप होणे गरजेचे आहे. कामे संपल्यानंतर त्याची देयके १५ दिवसात मिळणे आवश्यक आहे. २० लाख रुपयांपर्यंतचे काम विना निविदा लॉटरी पद्धतीने होणे गरजेचे आहे. तसेच २० लाखावरचे काम स्पर्धेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.