आमचे जीवन घाणीतच जाणार!

By admin | Published: July 28, 2014 01:30 AM2014-07-28T01:30:02+5:302014-07-28T01:30:02+5:30

गावात पाय ठेवताच उकिरड्यांचे दर्शन होते. अंतर्गत रस्त्यावरही शेणखतांचे ढिगारे पडलेले आहे. सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्यांतून येणारी दुर्गंधी व रस्त्यावरील चिखल तुडवत वाट काढावी लागते.

Our lives will be dirty! | आमचे जीवन घाणीतच जाणार!

आमचे जीवन घाणीतच जाणार!

Next

चनोडावासीयांची कैफियत : गावात उकिरडे, तुंबलेल्या नाल्या व चिखलाचे साम्राज्य
अभय लांजेवार - उमरेड
गावात पाय ठेवताच उकिरड्यांचे दर्शन होते. अंतर्गत रस्त्यावरही शेणखतांचे ढिगारे पडलेले आहे. सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्यांतून येणारी दुर्गंधी व रस्त्यावरील चिखल तुडवत वाट काढावी लागते. उमरेड तालुक्यातील चनोडा गावातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेली ही घाण. दोन दिवसांपासून येथे गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.
प्रशासकीय यत्रंणा थातूरमातूर कामाला लागली. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने येथे येऊन ग्रामस्थांची साधी वास्तपुस्त केली नाही. या घाणीतच आमचे जीवन चालले आहे, अशा शब्दांत गावकऱ्यांनी त्यांची कैफीयत मांडली.
लिकेज व्हॉल्व्ह
चनोडा येथे गेल्या काही वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. गावात तीन ठिकाणी असलेले व्हॉल्व्ह लिकेज आहे. ते जमीन पातळीवर आहेत.
नाल्यांमधील सांडपाणी या व्हॉल्व्हच्या माध्यमातून पाईपलाईनमध्ये शिरते. याच गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्यावर चनोडावासीयांना रोज त्यांची तहान शमवावी लागते, असा आरोप नागरिकांनी केला.
खाटेवरच उपचार
सिर्सी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने ग्रामपंचायत कार्यालयातील खोलीत औषधोपचार करायला सुरुवात केली. या ठिकाणी खाटेवरच रुग्णांची तपासणी करण्याचे व सलाईन लावण्याचे काम सुरू होते. ही खाटही रुग्णांनी त्यांच्या घरून आणली होती. शनिवारी दुपारी सौरभ झाडे याच्यावर उपचार सुरू होते. येथील रुग्णांची संख्या अधिक असून, आरोग्य विभाग ही संख्याही लपवीत असल्याचा आरोप नत्थू भट, व गजानन भट यांनी केला. शनिवारी सकाळी पल्लवी गजानन वाटकर या अडीच वर्षाच्या चिमुकलीस हगवण व उलटीचा त्रास सुरू झाला होता. विनोद सुरेश शेरकी याच्यावरही उपचार करण्यात आले. मात्र, त्यांचे नाव रुग्णांच्या यादीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गावात घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. टी. वाघमारे यांनी दिली. गावात फेरफटका मारला असता, पुष्पा चिकनकर व रूख्माबाई भुते यांनी सांगितले की, आरोग्यसेविका त्यांच्या घराशेजारी सर्वेक्षण व तपासणीसाठी आल्या होत्या. ‘घरासमोर चिखल असल्याने आता आम्ही तुमच्या घरी येत नाही. चिखल वाळल्यावर येऊ’ असे सांगून निघून गेल्या. दोन दिवसांपासून कुणीही आले नाही, असेही महिलांनी सांगितले.

Web Title: Our lives will be dirty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.