आपल्या कर्तृत्त्वाला सलाम पण; ठाकरेंच्या शिवसेनेचं एकनाथ शिंदेंना एकच चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 08:57 AM2022-12-29T08:57:37+5:302022-12-29T08:59:08+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना चॅलेंजही दिलं आहे. तर, एकजरी आमदार पराभूत झाला तर, राजीनामा देऊ या शिंदे यांच्या विधानाची आठवणही करुन दिली
मुंबई - विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना यंदा पाहायला मिळत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कर्नाटक सीमावाद आणि मंत्रीमहोदयांचे भ्रष्टाचार हे मुद्दे गाजत असून राज्य सरकारने सीमाप्रश्न ठराव संमत करत कर्नाटक सरकारला ठणकावून इशारा दिला आहे. यावेळी, ठराव समंत झाल्यानंतर चर्चेदरम्यान शिवसेना नेते आणि माजीमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उपहासात्मक कौतुक केलं. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना चॅलेंजही दिलं आहे. तर, एकजरी आमदार पराभूत झाला तर, राजीनामा देऊ या शिंदे यांच्या विधानाची आठवणही करुन दिली.
आपल्या कर्तृत्त्वाची ३३ देशांनी नोंद घेतली आहे. त्यामुळे, आपल्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला कौतुक आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार आणि १३ खासदार तुमच्यावर विश्वास ठेऊन येतात, म्हणजे तुम्हाला सलाम आहे. मात्र, आता आमची एकच विनंती आहे. की, बाळासाहेबांच्या पायावर हात ठेऊन तुम्ही शपथ घ्या की, यापुढे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असे विनंतीपूर्वक चॅलेंजच अनिल परब यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले. तसेच, भाजपच्या मदतीने निवडून येऊ नका, आम्हाला वाईट वाटेल, असेही ते म्हणाले. त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदेंनीही अनिल परब यांना उत्तर दिलं.
ज्या दिवशी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात, त्यादिवशीच बाळासाहेबांचे नाव घ्यायचा, त्यांच्या पायाला हात लावायचा अधिकार गमावला. बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार केवळ आम्हाला आहे, असे म्हणत शिंदेंनी परब यांच्यावर पलटवार केला. तसेच, तुम्हीही निवडून येण्यासाठी यांचाच म्हणजे मोदींचा फोटो लावला होता, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेते अनिल परब यांनी केला.