वर्ध्यात ‘आऊट डेटेड’ बसेस रस्त्यावर
By admin | Published: June 14, 2017 03:16 PM2017-06-14T15:16:03+5:302017-06-14T15:16:03+5:30
राज्यातील तब्बल ४० टक्के बसेस आऊट डेटेड झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
प्रशांत हेलोंडे
वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे तब्बल १६ हजार एसटी बसेस आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे एक हजार नवीन बसेसची खरेदी केली जाते व तेवढ्याच बसेस मोडित काढल्या जातात; पण मागील वर्षी महामंडळाला तोटा होत असल्याच्या नावाखाली नवीन खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी, जुन्या खिळखिळ्या झालेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. महामंडळाकडून प्रत्येक दहा महिन्यांनी नवीन बसेसची खरेदी करण्याचे धोरण होते. यात किलोमीटर आणि वर्षांचा हिशेब ग्राह्य धरून जुन्या बसेस भंगारात काढण्याचे प्रमाण ठरविले जात होते. हे प्रमाण लक्षात घेतले तर बहुतांश बसेस मोडित काढण्याच्या स्थितीत आहेत; पण नवीन बसेस उपलब्ध होत नसल्याने त्याच एसटीकडून सेवा घेतली जात आहे. राज्यातील तब्बल ४० टक्के बसेस आऊट डेटेड झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ९७ बसेस ‘आऊट डेटेड’
वर्धा जिल्ह्यात ३१३ बसेस आहेत. यापैकी किलोमीटरचा विचार केल्यास ९७ बसेस दहा वर्षांपेक्षा अधिक काळ चालल्याचे दिसून येते. वर्षांचा हिशेब ग्राह्य धरल्यास जिल्ह्यात नऊ ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून रस्त्यावर असलेल्या बसेसची संख्या ६८ च्या वर आहे. वास्तविक, या बसेस मोडित काढून नवीन बसेस रूजू करणे गरजेचे आहे; पण भंगार बसेसद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात असल्याचे दिसते.
प्रत्येक वर्षी राज्य परिवहन महामंडळाकडून नवीन बसेसची खरेदी केली जात होती; पण दहा महिन्यांपासून खरेदी बंद आहे. यामुळे जिल्ह्याला एकही नवीन बस मिळालेली नाही. नवीन बससाठी प्रस्ताव पाठविला आहे; पण खरेदीच बंद असल्याने जुन्याच बसेस प्रवाशांच्या सेवेत रूजू आहेत.
- अविनाश राजगुरे, प्रभारी, विभाग नियंत्रक, रापम, वर्धा.