२,३४१ विद्यार्थ्यांपैकी ७५१ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’चा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 08:00 AM2022-02-13T08:00:00+5:302022-02-13T08:00:02+5:30
Nagpur News फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी व भिवापूर तालुक्यातील ३२ टक्के म्हणजेच २,३४१ पैकी ७५१ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’ने विळखा घातला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी व भिवापूर तालुक्यातील ३२ टक्के म्हणजेच २,३४१ पैकी ७५१ विद्यार्थ्यांना ‘डेंटल फ्लोरोसिस’ने विळखा घातला आहे. या आजारावर थेट उपचार नाहीत. ‘कॉस्मेटिक’ उपचार आहेत. हा उपचार राष्ट्रीय फ्लोराेसिस नियंत्रण व प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या बालदंत रोग विभागात नि:शुल्क केला जाणार आहे, तसा सामंजस्य करार आरोग्य विभाग व महाविद्यालयामध्ये नुकताच झाला आहे.
महापालिकेच्या पाण्यामध्ये साधारण ‘०.७२१ पीपीएम’ फ्लोराइड असते. पाण्यात एवढे फ्लोराइड असल्यास दाताला कीड लागत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकानुसार पेयजलात फ्लोराईडचे प्रमाण ‘१.५ पीपीएम’पेक्षा जास्त आढळल्यास ‘फ्लोरोसिस’ आजार होतो. विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्यात सर्वाधिक फ्लोराइड आढळून येते. विशेषत: जेवढ्या खोलातून पाणी उपसा होताे, तेवढे फ्लोराईड वाढते. सध्याच्या स्थितीत पाणी समस्येमुळे फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या डोके वर काढू लागली आहे. पेयजलाच्या समस्येच्या तीव्रतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक हा आठवा असला, तरी विदर्भासह इतरही भागांत या विकाराने मोठा विळखा घातला आहे.
३२ गावांमध्ये तपासणी
फ्लोरोसिसच्या मुख्य लक्षणांमध्ये दातांवर पांढरे, पिवळे डाग दिसणे हे आहे. फ्लोरोसिसची समस्या वाढल्यावर डागही वाढतात. याची दखल घेत राष्ट्रीय फ्लोराेसिस नियंत्रण व प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत या विकाराच्या रुग्णांचा शोध घेणे व त्यांना उपचाराखाली आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या जिल्हा फ्लोरोसिस कन्सल्टंट रश्मी शेंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नागपूर जिल्ह्यातील ३२ गावांतील २ हजार ३४१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यातून ७५१ विद्यार्थ्यांमध्ये फ्लोरोसिसचा आजार आढळून आला.
मध्यम व गंभीर १२४ रुग्ण
शेंडे यांच्यानुसार फ्लोरोसिसचे सर्वाधिक रुग्ण उमरेड तालुक्यात, भिवापूर तालुक्यातील तास्क गावात, पारशिवनी तालुक्यातील उमरी, पालीया आणि भूकशी या गावांमध्ये आढळून आले. आढळून आलेल्या फ्लाेरोसिसच्या ६२७ विद्यार्थ्यांना सौम्य, ११५ विद्यार्थ्यांना मध्यम तर ९ विद्यार्थ्यांना गंभीर आजार आढळून आला. मध्यम ते गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले जात आहे.
पहिल्या टप्प्यात २० विद्यार्थ्यांवर उपचार
राष्ट्रीय फ्लोरोसिस नियंत्रण व प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत आरोग्यसेवा संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने मध्यम व गंभीर फ्लोरोसिस आजाराच्या विद्यार्थ्यांवर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयातील बाल दंतरोग विभागात उपचार केले जाणार आहेत. १०-१० विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर हे उपचार होणार असून, सध्या २० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी बाल दंतरोग विभागाचे सर्व डॉक्टर परिश्रम घेत आहेत.
-डॉ. रितेश कळसकर, प्रमुख बाल दंतरोग विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय