नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ : विभागीय आयुक्तांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 09:05 PM2020-05-08T21:05:31+5:302020-05-08T21:10:19+5:30
कोरोनामुळे शाळा बंद आहे. घरात बसून मुले कंटाळलेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी, कंटाळलेल्या वेळेत मनोरंजनात्मक शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे म्हणून नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद आहे. घरात बसून मुले कंटाळलेली आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी, कंटाळलेल्या वेळेत मनोरंजनात्मक शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे म्हणून नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे. या मुलांना दूरस्थ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून हा एक नावीन्यपूर्ण रेडिओ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ‘अध्ययन निष्पत्ती’ आधारित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमाची जोड देण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूरच्या ‘अ’ केंद्रावरून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी १०.३५ वाजता प्रक्षेपित केला जात आहे. पालकांना मुलांचा अभ्यास घेणे सोपे जावे म्हणून त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अभ्यासमाला पाठविण्यात येत आहे. सर्व अभ्यासमाला या ‘करूया थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती’ या तत्त्वावर आधारित असून, नजीकच्या काळात यात शालेय पाठ्यपुस्तकातील घटकांचासुद्धा समावेश करण्यात येईल. पालकांना अभ्यासमाला पाठविण्यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक संग्रहित करण्यात आले आहेत. गावातील पालकांचे व्हॉट्सअॅप गट तयार केले असून, त्या गटावर अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांच्या मदतीने अभ्यासमाला पाठविली जात आहे. या अभ्यासमालेत दोन गट तयार करण्यात आले आहेत. कार्यक्रमाची माहिती गावातील पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत गावात दवंडी देऊन पालकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अल्पावधीतच कार्यक्रमाला मुले व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर विभागातील जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून हा कार्यक्रम ऐकला जात असून, अभ्यासमालेसाठीसुद्धा मागणी होत आहे. राज्य शालेय शिक्षण विभाग व प्रथम संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे.
लाऊडस्पीकरच्या माध्यमातूनही प्रसारण
रेडिओ संच उपलब्ध नसल्यास हा कार्यक्रम ऐकण्यापासून पालक आणि मुले वंचित राहू नये यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना कार्यक्रम लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.