नियमबाह्य बदल्या संशयाच्या भोवऱ्यात
By admin | Published: March 7, 2017 02:05 AM2017-03-07T02:05:57+5:302017-03-07T02:05:57+5:30
पोलीस दलात कार्यरत असलेल्या काही जणांनी स्वत:च्या बदलीसाठी केलेली तिकडमबाजी विदर्भाच्या पोलीस दलात संशयाची वावटळ उठविणारी ठरली आहे.
पोलीस दलात चर्चेला उधाण : सारेच हातोहात, चौकशीला सुरुवात
नरेश डोंगरे नागपूर
पोलीस दलात कार्यरत असलेल्या काही जणांनी स्वत:च्या बदलीसाठी केलेली तिकडमबाजी विदर्भाच्या पोलीस दलात संशयाची वावटळ उठविणारी ठरली आहे. या बदलीच्या निमित्ताने फिरलेल्या चक्रामुळे अनेक अधिकारी चक्रावले आहेत. परिणामी नागपूर, अमरावती, यवतमाळच नव्हे तर मुंबईतही या बदली प्रकरणाने चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधीक्षक, आयुक्त कार्यालय आणि पोलीस महासंचालनालय अशा सर्वांचाच लक्षवेध करणाऱ्या या बदली प्रकरणात देवानंद दत्ताराव भोजे नामक उच्च श्रेणी लघुलेखकाचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
प्रारंभी भोजे अमरावती ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवारत होते. प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी आपल्याला लिपीक (वर्ग ३ चे पद) किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (वर्ग २, अराजपत्रित) म्हणून नियुक्ती मिळावी, असा विनंती अर्ज शासनाकडे केला होता. शासनाने सहानुभुतीने विचार करत त्यांना मंत्रालयात शिक्षण विभागात लघुलेखक म्हणून नियुक्ती दिली. काही दिवसानंतर त्यांना गृहमंत्रालयात संलग्न करण्यात आले. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बढती बदलीच्या अनेक घडामोडी झाल्या. त्यानंतर ३१ जानेवारी २०१७ ला भोजेंची अमरावती आयुक्तालयात उच्चश्रेणी लघुलेखक म्हणून बदली झाली. याचवेळी अनमोल वर्धे नामक उच्च श्रेणी लघुलेखकाची यवतमाळला बदली झाली. यानंतर ८ फेब्रुवारीला वर्दे यवतमाळात तर भोजे अमरावती आयुक्तालयात रुजू झाले. विशेष म्हणजे, आचारसंहिता सुरू असतानादेखील संबंधितांकडून या दोघांना कार्यमुक्त अन् रुजू करून घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
दोनच दिवसात १० फेब्रुवारीला भोजेंची बदली अमरावती आयुक्तालयातून ग्रामीण पोलीस अधीक्षक (अमरावती) कार्यालयात झाली. तसे आदेशपत्र स्वत: भोजेंनीच अमरावती एसपी लखमी गौतम यांच्या पीएच्या हातात नेऊन दिले. एवढ्यावरच हे बदली प्रकरण थांबले नाही. संबंधित एकाने खास सुटी घेऊन हे आदेशपत्र नागपूर एसपीच्या कार्यालयातही आणून दिले. तिकडे त्याच गतीने यवतमाळच्या वर्दे यांची बदली अमरावती आयुक्तालयात झाली. तर, अमरावती पोलीस अधीक्षकांचे स्वीय सहायक प्रवीण रामरावजी पवार यांची बदली नागपूर ग्रामीणला आणि येथील उच्च श्रेणी लघुलेखक संजय मोहोड यांची बदली नागपूर शहरात झाल्याचे दाखविण्यात आले.
अन् संशय बळावला
भोजे हे बदलीचे आदेशपत्र घेऊन अमरावतीचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे गेले. त्यानंतर संशयकल्लोळ सुरू झाला. अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत भोजे आणि वर्देची बदली एका ठिकाणाहून दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे कशी झाली, असा प्रश्न उपस्थित झाला. अवघ्या १० दिवसात विशिष्ट बदल्या वारंवार कशा झाल्या, त्याचे आदेश नियमित टपालात न येता थेट हातोहात (बाय हॅण्ड) कसे आले, असेही संशय निर्माण करणारे प्रश्न पडल्याने भोजेला रुजू करून घेण्याचे थांबवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाच्या संबंधाने पोलीस महासंचालनालयाकडे पत्रव्यवहार वजा चौकशी करण्यात आली. दरम्यान, अमरावती, नागपूर आणि यवतमाळ पोलीस अधीक्षकांचा एकमेकांशी संपर्क झाला. चर्चा अर्थातच बदलीशी संबंधित होती. त्यानंतर कार्यमुक्त करण्याच्या आणि रुजू करून घेण्याच्या प्रक्रियेला स्वल्पविराम मिळाला.
सारेच चक्रावले, कुणीच बोलेना !
उच्च श्रेणी लघुलेखक हे पद अराजपत्रित तसेच स्वीय सहायक हे पद राजपत्रित दर्जाचे आहे. बदली कायदा २००५ मधील कलम ४ (२) मधील तरतुदीनुसार मध्यवधी बदली असल्यामुळे त्यांच्या बदली प्रस्तावास गृहमंत्र्यांची (मुख्यमंत्र्यांची) मान्यता आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात मान्यतेची प्रक्रिया पार पडली नसल्याचे गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालनालयातील वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यामुळे तूर्त उपरोक्त सर्वच बदल्यांना ‘जैसे थे‘ ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची बदली प्रस्तावाला मान्यता नसताना बदल्यांचे हे आदेश काढण्याची हिंमत दाखविली कुणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संबंधाने अधिक माहितीसाठी नागपूरचे पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांच्याशी संपर्क केला असता, आपण आठ दिवस सुटीवर होतो, त्यामुळे याबाबत ताजी घडामोड माहीत नसल्याचे ते म्हणाले. तर, अमरावतीचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम दिल्लीला गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. अतिरिक्त अधीक्षक एम. मकानदार यांच्याशी संपर्क साधला असता, एसपी साहेबच यासंबंधात विस्तृत माहिती देऊ शकतात, असे ते म्हणाले.