बोंड अळीच्या प्रकोपाने आठ तालुके प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:48+5:302020-11-28T04:13:48+5:30
नागपूर : कापूस वेचणीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात या अळीचा प्रभाव ...
नागपूर : कापूस वेचणीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात या अळीचा प्रभाव दिसून येत आहे. ४००० हेक्टरच्या वर कापूस बोंड अळीच्या प्रभावाखाली असून हे प्रमाण ५ ते ७ टक्के असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. विभागाने शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचा भरोसा दिला असला तरी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता त्यांना आहे.
गेल्या काही वर्षांपासून बोंडअळीमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदासुध्दा बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. कृषी विभागाच्या मते प्रकोपचे प्रमाण कमी असले तरी ते वाढले आहे. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे यापूर्वीच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहेत. एकंदरीत जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान हे कापसाचे आहे. जिल्ह्यात कापसाची एकूण २ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यानंतर कसाबसा पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक कापणीवर आले असताना अचानक झालेल्या अवकाळी (परतीच्या) पावसाने होते नव्हते सारे उद्ध्वस्त करून सोडले. यात कपाशीचे सर्वाधिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांनी हाती आली तेवढी कपाशी पहिल्या व दुसऱ्या वेचणीत काढली होती तर तिसऱ्या व चौथ्या वेचणीची कपाशी शेतात असताना आता पुन्हा बोंडअळीने हल्ला चढविला आहे. याशिवाय भिवापूर तालुक्यातील नक्षी व पुल्लर या गावातील पिकांवर तुडतुड्यांनी हल्ला चढविला आहे.
या तालुक्यातील गावांमध्ये नुकसान
कृषी विभागाच्या सर्वेक्षण मोहिमेतर्गत जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील हाथला, रिधोरा, सावली (खु.), कोहळा, जुनेवाणी, मूर्ती, पांजरा, दिग्रस व गोंडीमोहगाव, नागपूर तालुक्यातील रूई व वराडा, उमरेड तालुक्यातील कावडापूर, गरमसूर, खैरी, मुरझडी व सूरजपूर, हिंगण्यातील कोटेवाडा, शिवमडका, खडकी व लखमपुरी, भिवापूरमधील बोटेझरी, नखी, बेसूर व चोरविहिरा, कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव व पोहगोंडी, नरखेडमधील भारसिंगी व सावनेर तालुक्यातील शेरडी या गावांमध्ये कापसावरील गुलाबी बोंडअळी ही आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्याचे आढळून आले आहे. जवळपास ४ ते ६ हजार हेक्टरमधील कापसावर अळीचा प्रकोप असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. इतर तालुक्यात बोंडअळी आटोक्यात असल्याचा दावा कृषी विभागने सर्वेक्षणातून केला आहे.