उपराजधानीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा प्रकोप होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:11 PM2020-07-02T12:11:07+5:302020-07-02T12:11:26+5:30
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.
रियाज अहमद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’, चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यू हे चारही वेगवेगळे आजार असले तरी सर्वांमध्ये सुरुवातीचे समान लक्षण म्हणजे ताप हेच आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा प्रकोप बघायला मिळू शकतो. अगोदर शहरात ‘कोरोना’चा संसर्ग दिसून येत आहे. अनेक भाग ‘कन्टेन्मेन्ट झोन’ झाले आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांसमोर या सर्व आजारांमध्ये नेमका फरक करणे हे मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना कसा करणार यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले.
‘कोरोना’मध्ये शरीराचे दुखणे कमी
मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या तुलनेत ‘कोरोना’मध्ये तापाच्या स्थितीत शरीराचे दुखणे फारच कमी असते. बाकी आजारांमध्ये शरीराचे दुखणे जास्त असते व थंडीदेखील वाजते. शिवाय ‘कोरोना’त अनेकदा तर रुग्णात लक्षण दिसूनदेखील येत नाही. ताप आल्यानंतर जर शरीराचे दुखणे कमी आहे तर ‘कोरोना’ असू शकतो. जर ज्येष्ठ नागरिक किंवा गंभीर आजाराने पीडित रुग्णाला ताप आला तर त्यांची ‘कोरोना’ चाचणी अत्यावश्यक आहे. अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.
ताप कमी झाला नाही तर चाचणी आवश्यक
वातावरण बदलामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरण बदलामुळे ताप आला असे तर तीन दिवस त्याचे औषध घेणे गरजेचे आहे. परंतु जर त्यानंतरही आराम पडला नाही तर तातडीने ‘कोरोना’सह इतर चाचण्या केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल राऊत यांनी केले.
इतर आजारात तापासह इतरही लक्षणे
‘कोरोना’सह मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारात प्राथमिक लक्षण तापच असतो. मात्र इतर आजारात तापासोबतच इतरही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे फरक केला जाऊ शकतो. चिकनगुनियामध्ये तापासोबतच सांधेदुखी होते तर डेंग्यूमध्ये ताप कमी-जास्त होत असतो व थंडी वाजते. त्यामुळे तापाच्या अवस्थेतच आजारातील फरक कळू शकतो. ‘कोरोना’च्या लक्षणांबाबत नेमकी स्पष्टता अद्यापही नाही. अ़नेकदा तर लक्षणेदेखील आढळत नाही. त्यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे मत डागा इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरफान उर्रहीम यांनी व्यक्त केले.