नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:05 AM2018-05-29T00:05:30+5:302018-05-29T00:05:41+5:30

मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. शिवाय, एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा (नाथजोगी वस्ती) येथे सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

Outbreak of family feuds at Udasa in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी

नागपूर जिल्ह्यातील उदासा येथे कौटुंबिक कलहातून जबर हाणामारी

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ जखमी, ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. शिवाय, एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा (नाथजोगी वस्ती) येथे सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
उदासा हे गाव उमरेडपासून नऊ कि.मी.वर आहे. येथील नाथजोगी वस्तीत वास्तव्याला असलेले राजेश्वर मांडवकर यांची मुलगी सोनी हिचा विवाह सुरेश तांबू याच्याशी झाला. सुरेश तांबू याची बहीण रामबाई हिचे लग्न रवी मांडवकर याच्याशी झाले. साधारणत: तीन वर्षापूर्वी हा विवाह पार पडला. कालांतराने दोन्ही परिवारात कलहाची ठिणगी पडली. त्यातच मुलींच्या नांदण्यावरून वारंवार खटके उडायला सुरुवात झाली. परिणामी, दोन्ही मुली आपआपल्या माहेरी परतल्याची माहिती जाणकारांनी दिली.
याच कारणावरून तांबू आणि मांडवकर कुटुंबात वाद उद्भवत गेले आणि त्यांच्यातील तक्रारी अनेकदा पोलीस ठाण्यात पोहोचत गेल्या. याला खुद्द पोलिसांनीही दुजोरा दिला. दरम्यान, सोमवारी सकाळी या दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा कलहाचा भडका उडाला. दोन्ही कुटुंबातील सदस्य हातात तलवार व लाठ्याकाठ्या घेऊन समोरासमोर आले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने १८ जण जखमी झाले. दरम्यान, उमरेड पोलिसांनी गणपती तांबू यांच्या तक्रारीवरून मोहनलाल मांडवकर आणि इतर १४ जणांविरुद्ध तसेच राजेंद्र मांडवकर यांच्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ४५२, ४२७, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.
जखमींची नावे
या घटनेत मोहनलाल राजेश्वर तांबू (३०), सोनी अनिल तांबू (२०), नीलीबाई लक्षपती बाबर (३५), अनिल राजेश्वर तांबू (२६), बसंती गुड्डू तांबू (३४), रोशन गुड्डू तांबू (१७), सुनील राजेश्वर तांबू (२३), बासेतू गुड्डू तांबू (४०), धरमनाथ परदेसी मांडवकर (३७) हे नऊ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. शिवाय, सुरेश राजेश्वर तांबू (२६), रवी राजेश्वर तांबू (२८), रमेश मोहनलाल मांडवकर, राजेश्वर बाप्पा मांडवकर (४५), गोदरीबाई गजानन चव्हाण (६०), जिजेस मोहनलाल मांडवकर (२२), राजेंद्र भाजीनाथ मांडवकर (२७), मोहनलाल जांबा मांडवकर (६७), रवी राजेश्वर मांडवकर (२३) या जखमींवर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
गावाला छावणीचे स्वरूप
या घटनेमुळे गावात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तणावाची परिस्थिती आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, आरोपींकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या लाठ्याकाठ्या जप्त करण्यात आल्या आहे. यात तलवारीचा वापर झाला की नाही, या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती उमरेडचे ठाणेदार प्रकाश हाके यांनी दिली.

Web Title: Outbreak of family feuds at Udasa in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.