आफ्रिकन तूर घोटाळ्यातील म्होरके बाहेरच
By admin | Published: October 27, 2015 03:51 AM2015-10-27T03:51:52+5:302015-10-27T03:51:52+5:30
कोट्यवधीच्या आफ्रिकन तूर घोटाळ्यातील चार आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी प्रथम श्रेणी
नागपूर : कोट्यवधीच्या आफ्रिकन तूर घोटाळ्यातील चार आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.एन. बेदरकर यांच्या न्यायालयाने नामंजूर केली. त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली.
पोलिसांनी अद्यापही या घोटाळ्यातील म्होरक्यांना हात लावलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आलम, सलाम आणि मुन्ना, अशी या म्होरक्यांची नावे आहेत.
कारागृहाकडे रवाना करण्यात आलेल्यांमध्ये राजवीरसिंग, रियाज अली, विनायक हाडके आणि मड्डीसिंग यांचा समावेश आहे. या आरोपींना २० आॅक्टोबर रोजी अटक करून त्यांच्याकडून ३२ टन आफ्रिकन तूर, ३ ट्रक, असा एकूण २७ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील बरेच डाळ व्यापारी बऱ्याच वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या तुरीचा व्यापार करतात. ही तूर मुंबईहून ट्रकने नागपुरात संबंधित व्यापाऱ्यांकडे येत होती. ही तूर व्यापाऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत वाटेतच मोठ्या प्रमाणावर तुरीची अफरातफर केली जात होती. विशिष्ट टोळ्यांचे नेटवर्क या घोटाळ्यात सक्रिय झाले होते. ठिकठिकाणच्या धाब्यांपासून तर छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत ही तूर पोहोचती होत होती. धरमकाट्यावरील तुरीच्या वजनाची तफावत दूर करण्यासाठी ट्रकमध्ये रेतीने भरलेली पोती लोड केली जात होती. अफरातफरीतील तूर अचानक आफ्रिकन तुरीचा व्यापार करणाऱ्या बड्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आली आणि बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. अनिमेष अशोक अग्रवाल (गोयल) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. ३५ टनाच्या तुरीचा घोटाळा झाल्याचे गोयल यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला होता. या धंद्यातील आणखी बरेच मोठे मासे अद्यापही पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत.
सोमवारी एएसआय राजेश ठाकूर यांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली असता न्यायालयाने ती नामंजूर केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. विलास डोंगरे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)