संत्रा, माेसंबीवर ‘ब्राउन राॅट’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:33+5:302021-07-03T04:07:33+5:30
ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा आणि माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात ‘ब्राउन राॅट’ ...
ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा आणि माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात ‘ब्राउन राॅट’ राेगाचा प्रादुर्भाव व्हायला व त्यामुळे संत्र्याच्या अंबिया बहाराची फळे गळायला सुरुवात झाली आहे. हा राेग बुरशीजन्य असून, त्याचा संसर्ग हवा व पाण्याच्या माध्यमातून हाेताे. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळीच याेग्य बुरशीनाशक व चिलेटेड झिंकची फवारणी करावी, असा सल्ला डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रदीप दवणे व काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.विनोद राऊत यांनी संयुक्तरीत्या दिली.
या राेगाच्या प्रादुर्भावामुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील अंबिया बहाराच्या संत्रा व माेसंबीची फळे माेठ्या प्रमाणात गळायला सुरुवात झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही फळगळ थांबविण्यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करूनही ही फळगळ थांबत नसल्याची माहिती संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली. दुसरीकडे, आपण कृषिसेवा केंद्र मालकांच्या सल्ल्यानुसार, महागड्या कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या राेगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी याेग्य वेळी याेग्य कीटकनाशक व बुरशीनाशकांची याेग्य प्रमाणात फवारणी करण्याचा सल्लाही डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रदीप दवणे व काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.विनोद राऊत यांनी दिला आहे.
...
२० हजार हेक्टरमध्ये बागा
काटाेल व नरखेड तालुक्यात एकूण २० हजार हेक्टरमध्ये संत्रा व माेसंबीच्या बागा आहेत. काटाेल तालुक्यात ५,४४२ हेक्टरमध्ये संत्राच्या बागा असून, यात १,३०४ हेक्टरमध्ये पाच वर्षांखालील तर ४,१३७ हेक्टरमध्ये पाच वर्षांवरील संत्राच्या बागांचा समावेश आहे. तालुक्यात ३,०४५ हेक्टरमध्ये माेसंबीच्या बागा असून, यात ६६१.५५ हेक्टरमधील बागा पाच वर्षांखालील तर २,७४४ हेक्टरमधील बागा पाच वर्षांवरील आहेत. यातील बहुतांश बागांवर पाने खाणारी अळी व ‘ब्राउन राॅट’ या राेगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
...
फळगळीची कारणे
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, फळमाशीचा प्रादुर्भाव, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीला पडलेला ताण, नत्र व झिंकची कमतरता यामुळेही संत्रा व माेसंबीची फळे गळतात. ‘ब्राउन राॅट’मुळे सुरुवातीला झाडांची पाने व नंतर फळांवर डाग पडतात. त्यामुळे फळगळती वाढत असून, फळांचा दर्जा खालावत असल्याची माहिती डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रदीप दवणे यांनी दिली.
...
या उपाययाेजना करा
या राेगाच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम नर्सरीमध्ये एलीएट, ॲन्ट्राकाॅल व चिलेटेड झिंक मिसळून फवारणी करावी. पाने व फळांवरील डाग कमी करण्यासाठी झिंक अत्यावश्यक असून, कंपन्या त्यांच्या उत्पादनात झिंक असल्याचा दावा करीत असल्या, तरी शेतकऱ्यांनी झिंक वेगळे खरेदी करावे. पाने खाणाऱ्या नागअळीच्या नियंत्रणासाठी पीपीएमचा निंबाेळी अर्क किंवा कन्फाइडर सुपर व डेसिस ही औषधे मिसळून फवारावी, असा सल्ला डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रदीप दवणे व काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.विनोद राऊत यांनी दिला आहे.