डासांचा प्रकोप वाढला; मनपा मात्र झोपेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 01:06 AM2020-08-09T01:06:33+5:302020-08-09T01:07:53+5:30
अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण नागपूरसह सीमावर्ती भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे. पूर्व,उत्तर, दक्षिण नागपूरसह सीमावर्ती भागातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. रिक्त भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याला वातावरण पोषक आहे. त्यात औषधाची फवारणी व फॉगिंग बंद असल्याने डासांचा प्रकोप वाढत आहे.
पूर्व नागपुरातील कळमना, विजयनगर, पारडी, भरतवाडा रोड, पुनापुर, गुलमोहर नगर, भांडेवाडी , वाठोडा,वर्धमान नगर,उत्तर नागपुरातील नारा- नारी, दीक्षित नगर, यशोधरा नगर, इंदोरा, जरीपटका आदी भागात डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दक्षिण नागपुरातील सीमावर्ती भागात अशीच परिस्थिती आहे. पश्चिम नागपूर,दक्षिण-पश्चिम नागपूर भागातही डासांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतानाही मनपा प्रशासनाने डासांना आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रभावी उपाययोजना हाती घेतलेली नाही.त्रस्त नागरिक नगरसेवक अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करतात परंतु कोविंड नियंत्रण कामात व्यस्त असल्याचे सांगितले जाते.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप पोहणे म्हणाले, प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. येथे पावसाचे पाणी जमा होते यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. नियंत्रणासाठी मनपा अधिकाºयांना फोन केला असता, ते ऐकायला तयार नाहीत. कोविडमध्ये ड्युटी असल्याचे सांगितले जाते. शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला तर याला मनपा प्रशासनास जबाबदार राहील. असेही पोहाणे म्हणाले.
अधिकाऱ्यांना सूचना करूनही उपयोग नाही
झिंगाबाई टाकळी परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंदर्भात मनपा अधिकाºयांना सूचना केली. परंतु कुठल्याही स्वरूपाच्या उपाययोजना केलेल्या नाही, अशी माहिती माजी नगरसेवक अरुण डवरे यांनी दिली. आधीच नागरिक दहशतीत आहेत. त्यात डेंग्यू उद्भवला तर परिस्थिती बिकट होईल.
नारा येथील रहिवासी संजय मेश्राम यांनी प्रभागाच्या नगरसेवकांना डासांचा प्रादुर्भाव विषयी माहिती दिली . परंतु नगरसेवकांची कुठलीही सूचना प्रशासनाकडून विचारात घेतली जात नाही अशी परिस्थिती आहे.