नागपुरी मोसंबी व संत्र्यावर फायटोप्थोरा ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 09:48 PM2020-09-05T21:48:29+5:302020-09-05T21:49:22+5:30
नागपुरी संत्र्यांवर तसेच मोसंबी पिकावर मागील काही दिवसात फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव आढळून आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्यांवर तसेच मोसंबी पिकावर मागील काही दिवसात फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची पहाणी करून वेळीच उपाय करावे, आणि संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन आयसीएआर-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान नागपूरचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी केले आहे.
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस असल्यामुळे संत्रा व मोसंबी फळबागांमध्ये ओले आणि दमट वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फायटोप्थोरा बुरशीची वाढ होत आहे. या रोगाची सर्वात गंभीर बाब म्हणजे फळ तोडणीच्या आधी फळांवर लक्षणे दिसत नाही. साठवण आणि वाहतुकीच्या दरम्यान संक्रमित फळे निरोगी फळात मिसळल्यास चांगल्या फळांना सुद्धा या रोगाची लागण होऊन प्रसार होतो. हा रोग फायटोप्थोराच्या दोन प्रजातींमुळे होतो. फायटोप्थोरा पाल्मिवोरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी ज्यामध्ये पाल्मिवोरा ही प्रजाती जास्त आक्रमक आहे. या प्रजातीचा प्रसार हवेमार्फत होऊन तो झाडांवरच्या फळांना संक्रमित करतो. याचे व्यवस्थापन प्रतिबंधावर अवलंबून असते. जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरून झाडाची छाटणी केल्याने या रोगाचे प्रमाण कमी करता येते.
जून-जुलै च्या दरम्यान किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (१% बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३.० ग्रॅम / लिटर) फवारणी केल्यास दमट हंगामात फायदा. पाऊस जास्त पडल्यास आॅगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बुरशीनाशकाची पुन्हा फवरणी करावी, असे आवाहन डॉ. एम.एस. लदानिया यांनी केले आहे.
असा आहे हा रोग
फायटोफोथोरा ब्राउन रॉट हा एक फळांचा रोग असून सतत दमट हवामान आणि पाण्याचा निचरा न होण्याशी संबंधित असतो. पावसाळ्याच्या उत्तरार्धात (मध्य ऑगस्ट ते ऑक्टोबर) जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव सामान्यत: दिसून येतो. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने सुरवातीला परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळांवर आढळून येते.