आऊटर रिंग रोडचे काम आता नवीन कंत्राटदारास ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:50+5:302021-09-16T04:12:50+5:30
दोन वर्षे उशीर, तरी ५० टक्केच काम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आऊटर रिंग ...
दोन वर्षे उशीर, तरी ५० टक्केच काम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आऊटर रिंग रोडचे काम आता नवीन कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. आतापर्यंत हे काम एमईपीडीएल ही कंपनी करीत होती. तिला दोन वेळा मुदतवाढ देऊनही ती काम पूर्ण करू शकली नाही. सात महिन्यांपूर्वी कंपनीला टर्मिनेशन नोटीस दिली होती. या नोटीसची मुदत ऑगस्टमध्ये संपली.
एनएचएआयच्या अधिकृत सूत्रानुसार कंत्राटदार कंपनीला लोन देणाऱ्या बँकेने अगोदरच नवीन कंत्राटदार निश्चित केला आहे. आता एनएचएआयकडून दस्तऐवजांची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आऊटर रिंग रोडचे काम जुलै २०१९ मध्ये पूर्ण व्हायला हवे होते. एकूण ११९ किमी लांबीचा हा आऊटर रिंग रोड आहे. यात ६२ किमीचे काम शिल्लक राहिले आहे. हे काम जामठा ते फेटरी (टप्पा -१) व फेटरी ते धारगाव (टप्पा -२ ) अशा दोन भागांत विभागण्यात आले आहे. टप्पा १ चे काम ५० टक्के तर टप्पा २ चे काम ४५ टक्के झाले आहे. चार पदरी असलेला हा मार्ग सिमेंटचा बनवला जात आहे. गेल्या सात महिन्यांत टप्पा एकच्या कामाची प्रगती पॉइंट ४३८ टक्के आणि टप्पा दोनच्या कामाची प्रगती पॉइंट १६ टक्के दरदिवस इतकी राहिली. अधिकृत सूत्रानुसार कामाची ही प्रगती जवळपास ६ टक्के इतकी होती, हे विशेष.
बॉक्स
- १९ वर्षांपूर्वी तयार झाली योजना
सार्वजनिक बांधकाम विभागाने २००० साली या कामाची योजना तयार केली होती; परंतु काम सुरू होऊ शकले नाही. रस्त्यासाठी अगोदरच भूसंपादन झाले असल्याने एनएचएआयला कुठलीही प्रतीक्षा करावी लागली नाही. काम सुरू करताच अगोदरच ४२ किमीचा रिंग रोड बनवण्यात आला. संशोधनानंतर उर्वरित ६२.०३५ किमीचे काम जानेवारी २०१७ पासून सुरू झाले होते.