सूक्ष्म उद्योगांसाठी देशात ४०० क्लस्टर्ससाठी आराखडा : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:58 PM2020-04-16T20:58:42+5:302020-04-16T21:01:20+5:30
देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योजकांनादेखील फटका बसतो आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्रात सुमारे ११ कोटी कामगार काम करतात. अनेक कामगार गावांकडे परतले आहेत. ही बाब लक्षात ठेवता देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्रीनितीन गडकरी यांनी केले. ‘पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री’च्या प्रतिनिधींसमवेत त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला.
‘कोरोना’मुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा प्रभाव देशातील लहान उद्योगांवर पडला आहे. त्यामुळे त्या उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हा संवाद साधण्यात आला. या उद्योजकांचे मनोबल कायम राहावे व आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी सूक्ष्म-लघु-मध्यम मंत्रालय पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहील. संकट संपल्यानंतर अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रतिनिधींनी उद्योगजगतातील अडचणी व चिंता मांडल्या. वीज व पाणीच्या देयकांमध्ये ठराविक शुल्क माफ करावे, काही वस्तूंना आवश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट करणे, ‘लॉकडाऊन’दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधीतून करावे, ‘सबसिडी’च्या माध्यमातून आर्थिक संकट दूर करावे, वस्तूंच्या निर्यातीसाठी वाहतुकीमध्ये दिलासा इत्यादी उपाय त्यांनी सुचविले. या सर्व बाबी अर्थमंत्री व भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर ठेवू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
महामार्ग निर्माणाचा वेग वाढविणार
‘लॉकडाऊन’मुळे वाहतूक व्यवसायाशी जुळलेल्यांचा रोजगार ठप्प आहे. हजारो ‘ट्रक्स’ थांबले असून त्यांच्यात कोट्यवधींचा माल आहे. त्यामुळे अनेकांचा नुकसान होत आहे. या सर्वांची नुकसानभरपाई कशी होईल, यावर विचार सुरू आहे. शिवाय ‘लॉकडाऊन’ संपताच महामार्ग निर्माणाच्या कार्याचा वेग वाढविण्यात येईल. त्यामुळे मजुरांची मागणी वाढेल व त्यांना लगेच काम मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले.