कॉम्पोनंट ब्लडसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता

By admin | Published: November 2, 2015 02:15 AM2015-11-02T02:15:41+5:302015-11-02T02:15:41+5:30

एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनंट) तयार करता येतात.

Outpatient Road for Component Blood | कॉम्पोनंट ब्लडसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता

कॉम्पोनंट ब्लडसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता

Next

मेडिकल : एफडीएची ‘होल ब्लड’ला परवानगी
नागपूर : एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनंट) तयार करता येतात. म्हणजेच एका रक्तदात्याने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन रुग्णांना होऊ शकतो. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्त घटक वेगळे करणारी यंत्रणा असलीतरी दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) ‘होल ब्लड’ला परवानगी देत ‘कॉम्पोनंट ब्लड’ला नाकारली आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांवर ‘प्लेटलेट’साठी भटकंतीची वेळ आली.
मेडिकलमध्ये विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून रुग्ण येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. उपचारांदरम्यान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियार करीत असताना रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर एफडीएने बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यानंतर शुक्रवारी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. १५ लाखांच्या या मशीन स्थापन होण्यापासून त्यावर प्रत्यक्ष काम करण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार आहे. परंतु तो पर्यंत गरीब रुग्णांवर पदरमोड करून बाहेरून ‘कॉम्पोनंट ब्लड’ विकत घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)

डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण अडचणीत
उपराजधानी डेंग्यूच्या तापाने फणफणली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १३० जणांना डेंग्यू झाला आहे. मात्र, याच्या दुप्पट रुग्ण सध्याच्या स्थितीत उपचार घेत असल्याची माहिती आहे. शासकीयसह अनेक खासगी इस्पितळात या रोगाचे मोठ्या संख्येत रुग्ण आहेत. या रोगासह मलेरियाच्या रुग्णांमधील रक्तातील प्लेटलेटस् झपाट्याने कमी होतात. परिणामी प्लेटलेटस्च्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु मेडिकलमध्ये ‘कॉम्पोनंट ब्लड’साठी परवानगी नाकारल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांना पदरमोड करीत खासगी रक्तपेढीतून रक्तघटक घ्यावे लागत आहे.
नियमांचे उल्लंघन
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे रक्तपेढीचे ब्रीद आहे. अलीकडेच रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली जगातील सर्वात अत्याधुनिक नॅट (न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान शासकीय रक्तपेढीत लावण्याच्या सूचना आहेत. त्या तुलनेत मेडिकल रक्ताची सुरक्षितात तर देत नाहीच उलट ‘होल ब्लड’ देऊन नियमांचे उल्लंघन करीत आहे.

Web Title: Outpatient Road for Component Blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.