दलित, गरीब, शेतकऱ्यांचा आक्रोश मोदींना पदावरून घालवेल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:10 AM2021-08-13T04:10:39+5:302021-08-13T04:10:39+5:30
नवी दिल्ली : देशातील गरीब, दलित, शेतकरी, मजूर यांचा आक्रोश एक दिवस वादळाचे रूप धारण करेल व पंतप्रधान नरेंद्र ...
नवी दिल्ली : देशातील गरीब, दलित, शेतकरी, मजूर यांचा आक्रोश एक दिवस वादळाचे रूप धारण करेल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पंतप्रधान पदावरून हुसकावून लावेल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी जंतरमंतरवर बोलताना दिला.
देशभरात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचाराविरुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांविरुद्ध केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने नवी दिल्लीत गुरुवारी जंतरमंतरवर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. वेणुगोपाळ, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, के. एच. मुनियप्पा, सुश्मिता देव, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, आज घटनेवर, संविधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे काही चार ते पाच उद्योगपती मित्र हे आक्रमण करत आहेत. आपण जिथे बघाल तिथे संविधानावर हल्ला केला जात आहे. संसदेत शेतकऱ्यांचे, दलितांचे आणि मागासवर्गीयांचे, महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यास बोलू दिलं जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. हे भित्रे लोक आहेत. त्यांच्याशी लढताना घाबरू नका. भारतीय कोणत्याही शक्तीपुढे घाबरत नाहीत हे लक्षात ठेवा, अशा शब्दात त्यांनी संघ परिवार व मोदी सरकारविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
दलितांना घाबरून संसदेचे काम स्थगित : नितीन राऊत
- केंद्रातील मोदी सरकार आज हल्लाबोल आंदोलनासाठी जमलेल्या दलितांना घाबरली आणि त्यांनी संसदेचे कामकाज स्थगित केले, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी हल्लाबोल केला. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे आरक्षण रद्द करायला हवे, अशी मागणी करतात. त्यांचेच सहकारी व भाजप आरक्षणाच्या बाजूने बोलते. यांच्यातली नेमकी खरी भूमिका कोणती? दलित समाज केवळ आरक्षण नव्हे तर प्रतिनिधित्व मागतोय आणि ते प्रतिनिधित्व केवळ काँग्रेसने दिले आहे, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील दलित अत्याचारावर लक्ष नाही : फडणवीस
- काँग्रेस नेते दिल्ली व इतर ठिकाणी दलित अत्याचाराविरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र, महाराष्ट्रात होत असलेल्या दलित अत्याचाराच्या घटनांकडे त्यांचे लक्ष नाही. ते याबाबत काहीच बोलत नसून पीडितांना सांत्वना देण्याचेही टाळत आहेत, अशी टीका करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावर नेम साधला.