पंतप्रधान नरेंद्र माेदींना बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ भेट दिल्यामुळे संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:07 PM2022-06-29T12:07:47+5:302022-06-29T12:08:20+5:30
हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देहू येथील भेटीदरम्यान सुदर्शन कपाटे या व्यक्तीने बंदी असलेला वि. भि. काेलते संपादित आक्षेपार्ह ‘लीळाचरित्र’ ग्रंथ भेट दिल्याचा आराेप अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केला आहे.
हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे. असे असताना पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष आहे.
अ. भा. महानुभाव महामंडळाने याबाबत पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली असून, दाेषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कपाटे यांनी थेट पंतप्रधानांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप महामंडळाच्या अध्यक्ष तृप्ती बाेरकुटे यांनी केला.
डाॅ. काेलते यांनी हेतुपुरस्सरपणे चक्रधर स्वामींची बदनामी करणारा ग्रंथ प्रकाशित केला. शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९७८ व १९८२ ला या ग्रंथाचे प्रकाशन केले हाेते. त्यानंतर महानुभाव धर्मीयांनी या ग्रंथाविराेधात रान पेटविले हाेते. त्यानंतर शासनाने शासकीय प्रकाशनावर स्थगिती व कुठल्याही प्रकाशनावर बंदी आणि प्रकाशित ग्रंथांच्या जप्तीचे आदेश दिले हाेते.
उच्च न्यायालयानेही या ग्रंथावर बंदी व जप्तीचे आदेश दिले आहेत. शासनाचे बंदी आदेश कायम असताना शासकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना हा ग्रंथ सार्वजनिक स्वरूपात भेट देणे गुन्हेगारी स्वरूपात माेडते, असे बोरकुटे यांचे म्हणणे आहे.