वाहतूक शाखेची अफलातून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:12+5:302021-04-28T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाईचा एक अफलातून नमुना पुढे आला. चार महिन्यांपूर्वी स्कूटर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी वाहतूक शाखा पोलिसांच्या कारवाईचा एक अफलातून नमुना पुढे आला. चार महिन्यांपूर्वी स्कूटर वाल्याने केलेल्या चुकीचा दंड पोलिसांनी एका एसयूव्हीच्या मालकाकडून वसूल केला.
प्रकरण असे आहे, शहरातील एक सद्गृहस्थ आपल्या कारने व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी घरून निघाले. सकाळी ११ वाजता त्यांना इस्पितळात पोहचायचे होते. इटर्निटी मॉलच्या चौकातून ते पुढे निघत नाही तोच वाहतूक शाखेच्या एका पोलिसाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. कार थांबवताच त्या पोलिसाने कार चालकांना तुम्ही सिग्नल जम्प केल्याचे सांगून बाराशे रुपये दंड भरावा लागेल, असे म्हटले. संबंधित कार चालकाने सिग्नल लाल होण्यासाठी काही वेळ बाकी होता, त्यामुळे ते चौकातून पुढे निघाले. सिग्नल तोडण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता, असे सांगितले. चूक झाली मात्र ती जाणीवपूर्वक केली नाही असेही पोलिसांना सांगितले मात्र पोलीस ऐकायला तयार नव्हता. त्याने बाराशे रुपये घेऊन चालान पावती कापून कारचालकांच्या हातात ठेवली. बाराशे रुपये देऊन पावती घेतल्यानंतर कारचालक आपल्या सीटवर बसले आणि त्यांनी पावती बघितली असता ती फक्त पाचशे रुपयांची होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा कारखाली उतरून पोलिसाला त्याबाबत विचारणा केली. यावेळी पोलिसांनी तुमच्या नावे एक जुनी चूक असून त्याचा दंड ५०० रुपये यावेळी कापण्यात आल्याचे सांगितले. पाचशे ते आणि ५०० आता असे एक हजार रुपये होत असताना बाराशे रुपये कसे काय घेतले, जुनी चूक होती तर आतापर्यंत मला नोटीस का पाठविली नाही, अशी विचारणा केली असता पोलीस बॅकफूटवर गेला. त्याने ७०० पैकी ५०० रुपये कार मालकाला परत केले. दोनशे रुपयांचे काय, अशी विचारणा केली असता टाटा बाय-बाय करत पोलीस बाजूला निघून गेला. कार चालकाला रुग्णालयात जाण्यासाठी वेळ होत असल्यामुळे ते त्यावेळी निघून गेले. नंतर घरी पोहोचल्यावर त्यांनी वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आपण कधी चूक केली होती, ते तपासले असता त्यांना धक्काच बसला. पोलिसांच्या स्क्रीनवर आलेल्या कारवाईच्या नोंदीनुसार १२ डिसेंबर २०२० रोजी एमएच ३१/ एके ७७७६ चा दुचाकीचालक कुणाल दोहारे याने विनापरवाना दुचाकी चालवली होती त्यामुळे पोलिसांनी त्याला चालान पाठविले होते. मात्र आज पोलिसांनी ज्या कारवर कारवाई केली त्या कारचा नंबर एमएच ३१/ ईके ७२२६ होता. वाहन वेगळे, त्यांची सिरीज आणि क्रमांकही वेगवेगळे असून वाहतूक पोलिसांनी ही अशी गंभीर चूक कशी केली, यात काय घोळ आहे, ते कळायला मार्ग नाही.
---
अनेकांना चुना
अशाप्रकारे वाहतूक पोलीस शहरातील आणखी किती लोकांना चुना लावत असतील, असाही प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
---