मनपातील थकीत बिलाचा वाद पोलिसात पोहचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:11 AM2019-03-21T01:11:03+5:302019-03-21T01:14:47+5:30
महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या विरोधात कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या विरोधात कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
महापालिकेतील कंत्राटदार नागसेन हिरेखण यांचे लाखो रुपयांचे बिल बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. होळीमुळे कामगार व माल पुरवठादार पैशासाठी त्यांच्या घरी पोहचले. देणी देण्यासाठी तसेच मुलांची फी, स्वत:चा उपचाराचा खर्च कयावयाचा असल्याने बिलातील काही रक्कम मिळावी, अशी मागणी हिरेखण यांनी वित्त विभागाकडे केली. मात्र काही दिवसापूर्वी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर व वित्त अधिकारी नितीन कापडनीस यांचे भेट घेतली होती. त्याचवेळी हिरेखण थकीत बिलासाठी पोहचले. परंतु आयुक्त व वित्त अधिकाऱ्यांनी संघटनेचा हवाला देत क्रमवारीनुसार बिल देण्यात येईल असे सांगितले. यामुळे नाराज झालेले नागसेन हिरेखण यांनी विजय नायडू यांना सुनावले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. तसेच बुधवारी यासंदर्भात सदर पोलिसात विजय नायडू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
होळीमुळे देणीदारांची देणी देणे आवश्यक आहे. आयुक्त व वित्त अधिकारी बिल देण्यासाठी सहमत होते. परंतु नायडू यांनी आडकाठी घातल्याने बिल मिळाले नाही. थकीत बिलापैकी काही रकमेचीच मागणी केली होती. कंत्राटदार संघटनेची भूमिका लहान कंत्राटदारांना बाधक आहे. अशा परिस्थितीत या कंत्राटदारांनी संघटितपणे संघटनेच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. प्रशासन बिल देण्याला तयार असताना संघटनेने यात आडकाठी आणण्याची गरज नसल्याचे हिरेखण म्हणाले.
प्रशासनाचाच नियम आहे -नायडू
नागसेन हिरेखन वा अन्य लहान कंत्राटदारांची बीले रोखण्याची भूमिका संघटनेची नाही. क्रमारीनुसार बील दिले जात आहे. कंत्राटदार संघटनेच्या सांगण्यानुसार नियम करण्यात आलेले नाही. आयुक्त व वित्त अधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहेत. हिरेखन यांचे आरोप चुकीचे असल्याचे विजय नायडू यांनी सांगितले.