तलाठी कार्यालयांचे थकीत भाडे १० लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:06+5:302021-03-27T04:09:06+5:30
शरद मिरे भिवापूर : किरायाने राहणारे भाडेकरू नियमीत भाडे देत नसल्याच्या तक्रारी ऐकिवात आहे. प्रसंगी असे प्रकरण पोलिसातही पोहोचल्याच्या ...
शरद मिरे
भिवापूर : किरायाने राहणारे भाडेकरू नियमीत भाडे देत नसल्याच्या तक्रारी ऐकिवात आहे. प्रसंगी असे प्रकरण पोलिसातही पोहोचल्याच्या घटना आहेत. मात्र शासनाचे अधिकृत तलाठी कार्यालये पाच-पाच वर्ष घरभाडे थकीत ठेवत असेल तर याची तक्रार करायची कुणाकडे, हा प्रश्नच आहे. कारण तालुक्यात किरायाच्या घरात तलाठी कार्यालय असलेल्या १५ गावातील १८ घरमालकांच्या थकीत रकमेचा आकडा १० लाखाच्या घरात आहे. त्यामुळे ही थकबाकी मिळणार कधी, हा प्रश्नच आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच तलाठी साजामध्ये तलाठी कार्यालये किरायाच्या घरात आहे. त्यासाठी घरमालकाला एक हजार रुपये प्रति महिना घरभाडे दिल्या जाते. मात्र तालुक्यातील १५ गावांमध्ये किरायाच्या घरात असलेल्या तलाठी कार्यालयाचे घरभाडे गत पाच वर्षांपासून घरमालकाला देण्यात आलेले नाही. यात झमकोली, भगवानपूर, पिरावा, बेसूर, मांगरुळ, पाहमी, गोंडबोरी, सालेभट्टी, थूटानबोरी, अड्याळ, कारगाव, वासी, धामणगाव (वि.म.), तास व भिवापूर अशाप्रकारे १५ साजातील तलाठी कार्यालयाचे भाडे जुलै २०१५ ते मार्च २०२१ पर्यंत थकीत आहे. थकीत भाड्याची रक्कम १० लाख ३२ हजार रुपयाच्या घरात आहे. गत पाच वर्षांपासून किराया मिळत नसल्याने असला सरकारी भाडेकरू कोणत्या कामाचा, असा सूर घरमालकांकडून आळवला जात आहे. याबाबत काही घरमालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत थकीत घरभाडे तात्काळ देण्याची मागणीही केली आहे.
असा आहे थकीत रकमेचा आकडा
तालुक्यात १५ साजातील तलाठी कार्यालयाचे थकीत भाडे १० लाख ३२ हजार रुपये इतके आहे. साजानिहाय घरमालक व थकीत रक्कम पुढीलप्रमाणे आहे. रंजना वाकडे (३६-झमकोली), वाय.के. नन्नावरे (४०-भगवानपूर), आर.व्ही. चुटे (४०-अ-पिरावा), राजेश मुंडले (४४-मांगरुळ), परसराम पिल्लेवान (८२-पाहमी) प्रत्येकी ६९ हजार रुपये भाडे थकीत, जयंत दाणी (४१-बेसूर) ३८ हजार रुपये, रंजना कुकडे (४१-बेसूर) ३१ हजार रुपये, सुरेंद्र काकडे (८७-गोंडबोरी), मनमोहित घोडेस्वार (७६-अ-थूटानबोरी), राजपूत तांबे (७७-अड्याळ), बी.टी. राऊत (८०-कारगाव), खुशाल गजभिये (८६-वासी), शालू मेश्राम (९०-धामणगाव) यांचे प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे थकीत आहे. आनंद जनबंधू (७८-भिवापूर ) ४० हजार रुपये, विलास सहारे (७८-भिवापूर) ३० हजार रुपये, टा.क. देशमुख (७५-सालेभट्टी) १२ हजार रुपये, दारुबाबाई शेंडे (७५-सालेभट्टी) ५८ हजार रुपये, पंचमसिंग मोरे (७९-तास) यांचे ५८ हजार रुपये घरभाडे थकीत आहे.
थकीत १० लाख आणि मिळाले १५ हजार
तलाठी कार्यालयाच्या भाड्याची देय रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला प्राप्त होते. मात्र गत पाच वर्षांपासून घरभाड्याची देय असलेली आवश्यक पूर्ण रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही. परिणामी थकीत घरभाड्याचा आकडा वाढत गेला. तालुक्यात १५ तलाठी साजातील १८ घरमालकांचे तब्बल १० लाख ३२ हजार रुपये घरभाडे थकीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ १५ हजार रुपये तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे १५ हजार रुपये १८ घरमालकांना देणार कसे, हा प्रश्नच आहे.