राज्यात तब्बल १ लाख २३ हजार वाहनधारक लायसन्सच्या प्रतीक्षेत

By सुमेध वाघमार | Published: September 30, 2023 05:47 PM2023-09-30T17:47:19+5:302023-09-30T17:50:10+5:30

राज्यातील स्थिती : प्रिंटिंगला सुरुवात; परंतु अद्यापही प्रतीक्षाच

over 1 lakh 23 thousand vehicle owners are waiting for license in the state | राज्यात तब्बल १ लाख २३ हजार वाहनधारक लायसन्सच्या प्रतीक्षेत

राज्यात तब्बल १ लाख २३ हजार वाहनधारक लायसन्सच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) लवकरच मिळेल, या परिवहन विभागाच्या आश्वासनावर तीन महिने उलटून गेली; परंतु अद्यापही लोकांच्या हाती ना लायसन्स पडले, ना आरसी. राज्यात तब्बल एक लाख २३ हजार ६१५ वाहनधारक आजही लायसन्सच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाना ‘आरसी’ पुरविण्याचे काम हैदराबादमधील रोझमार्टा कंपनी तर वाहन परवाना (लायसन्स) प्रिंट करण्याचे काम हैदराबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनी (यूटीएल) करायची. परंतु दहा महिन्यांपूर्वी या दोन्ही कंपनीशी असलेला परिवहन विभागाचा करार संपला. जुलै महिन्यापासून कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड ॲण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून लायसन्स व आरसी प्रिंट होणार होते. परंतु सप्टेंबर महिना उजाडला तरी प्रिंटिंग सुरू झाली नव्हती. नागपुरात २० सप्टेंबरपासून प्रिंटिंगला सुरुवात झाली खरी; परंतु प्रिंट झालेल्या कार्डची नोंदणी, नंतर पोस्ट ऑफिस आणि नंतर वाहनधारकांच्या हातात पडायला आणखी दहा ते १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालये मिळून १ लाख २३ हजार ६१५ लायसन्स प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.

- पुण्यात २१ हजारांवर लायसन्स प्रलंबित

उपलब्ध माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील पुणे आरटीओ कार्यालयांतर्गत सर्वाधिक २१ हजार ६५७ लायसन्स प्रलंबित आहेत. या शिवाय, पिंपरी चिंचवड कार्यालयात ८ हजार ४६०, नाशिकमध्ये ७ हजार २६७, जळगावमध्ये ६ हजार ८२५, मुंबईमध्ये (वेस्ट) ५ हजार ७१८ लायसन्ससह इतर आरटीओ कार्यालयात चार हजार व त्यापेक्षा कमी लायसन्स प्रलंबित आहेत.

- १० हजार नागपूरकरांना हवे लायसन्स

पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ४ हजार ६१५, नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ४ हजार २३५, तर नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत १ हजार ६३६ असे एकूण १० हजार ४८६ नागपूरकरांना लायसन्स हवे आहे.

- रोज ४५ हजार लायसन्स प्रिंट

‘एमसीटी कार्ड ॲण्ड टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून नागपूर, मुंबई व पुणे येथील आरटीओ कार्यालयातून लायसन्स व आरसी प्रिंटिंगला सुरुवात झाली आहे. प्रत्येक कार्यालयातून रोज १५ हजार, त्यानुसार ४५ हजार लायसन्स प्रिंट होऊन ते पोस्ट कार्यालय आणि तेथून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे. काहींना लायसन्स व आरसी मिळणेही सुरू झाले आहे.

- संदेश चव्हाण, प्रमुख संगणक विभाग, परिवहन विभाग

Web Title: over 1 lakh 23 thousand vehicle owners are waiting for license in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.