कधी मिळणार लायसन्स, आरसी? १२ हजारांवर वाहनधारक प्रतिक्षेत
By सुमेध वाघमार | Published: July 17, 2023 06:20 PM2023-07-17T18:20:51+5:302023-07-17T18:21:51+5:30
वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण
नागपूर : नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ पुरवठा करणाºया कंपनीकडून अद्यापही प्रिटींगला सुरूवात झाली नाही. परिणामी, या दोन्ही ‘स्मार्ट कार्ड’ची प्रलंबित संख्या वाढून एकट्या नागपुरात १२ हजारांवर गेली आहे. ‘लायसन्स’ व ‘आरसी’ कधी मिळणार, याबाबत परिवहन विभागही उत्तर देत नसल्याने वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) व वाहन परवाना (लायसन्स) स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्वी हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीकडे होती. परंतु परिवहन विभागाचा या कंपनीशी असलेला करार संपुष्टात आला. नवीन पुरवठादार कंपनी नेमायला परिवहन विभागाकडून उशीर झाला. त्याचा नाहक फटका आता वाहनधारकांना बसत आहे.
परिवहन विभागाने नुकतेच ‘स्मार्ट कार्ड’ उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक येथील ‘एमसीटी कार्ड अॅण्ड टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमीटेड’, कंपनीसोबत करार केला. कंपनीने सात कोटींची अनामत रक्कम बँके त जमा केली. या कंपनीला ‘स्मार्ट कार्ड’ प्रिंट करण्यासाठी नागपूरच्या पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जागाही उपलब्ध करून दिली. परिवहन विभागानुसार १७ जुलैपासून ‘स्मार्ट कार्ड’ मिळणे सुरू होणार होते. परंतु आता कुठे कंपनीचे यंत्र यायला सुरुवात झाली. कंपनीने नेमलेल्या कर्मचाºयांना २४ जुलैपासून कामावर बोलविले आहे. यामुळे नवे ‘लायसन्स’ व ‘आरसी’ मिळण्यास ऑगस्ट महिना उजाळण्याची शक्यता आहे.