१.२५ लाखांहून अधिक मुलांचे डोळे ‘आळशी’; ‘ॲम्ब्लियोपिया’ आजार वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 08:00 AM2023-05-24T08:00:00+5:302023-05-24T08:00:06+5:30
Nagpur News ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेचा एक भाग म्हणून मागील शैक्षणिक वर्षात ८ लाख शालेयस्तरावरील मुलांची तपासणी करण्यात आली. यातील जवळपास १.२५ लाखांहून अधिक मुलांना ‘ॲम्ब्लियोपिया’ म्हणजे ‘आळशी डोळा’चा आजार आढळून आला.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेचा एक भाग म्हणून मागील शैक्षणिक वर्षात ८ लाख शालेयस्तरावरील मुलांची तपासणी करण्यात आली. यातील जवळपास १.२५ लाखांहून अधिक मुलांना ‘ॲम्ब्लियोपिया’ म्हणजे ‘आळशी डोळा’चा आजार आढळून आला. हा आकडा चिंता वाढविणारा आहे. वेळीच उपचार केल्यास दृष्टी वाचविणे शक्य आहे. त्यासाठी मुलाला शाळेत टाकण्यापूर्वी डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.
‘ॲम्ब्लियोपिया’ ही अशी स्थिती आहे, जिथे वाढत्या वयानुसार, मुलाचा एक डोळा दुसऱ्या डोळ्यापेक्षा कमी विकसित होतो. ‘ॲम्ब्लियोपिया’ने ग्रस्त असलेल्या मुलाचा मेंदू दोन्ही डोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी फक्त एकाच डोळ्यावर लक्ष केंद्रित करतो. या काळात मुलांची नजर आळशी होते आणि मज्जातंतू पेशी कमकुवत होतात. परिणामी, डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतात. अशावेळी वेळीच उपचार न केल्यास मेंदू त्या डोळ्याने काम करणे थांबवतो, ज्यामुळे कायमस्वरूपी दृष्टी समस्या होण्याचा धोका वाढतो.
- उशिरा निदानाचे प्रमाण मोठे
बालरोग नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिंकल फुसाटे यांनी सांगितले की, ‘ॲम्ब्लियोपिया’ हा आजार ७ वर्षे वयाच्या आधी त्याचे निदान करून उपचार केल्यास, मुलामध्ये पूर्ण दृष्टी सुधारण्याची शक्यता वाढते. परंतु, आपल्याकडे या आजाराविषयी जनजागृती नसल्याने, आजाराविषयी अज्ञान असल्याने उशिरा निदानाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे गुंतागुंत वाढून दृष्टिदोष निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ‘प्री-स्कूल’ वर्षांमध्ये नियमित डोळ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.
-बाळाच्या विकासाच्या वयात दृष्टिदोष
ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजी सोसायटीच्या शैक्षणिक आणि संशोधन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. प्रशांत बावनकुळे यांनी सांगितले की, ॲम्ब्लियोपियाचे प्रमुख कारण म्हणजे, बाळाच्या विकासाच्या वयात दृष्टिदोष. यात प्रभावित डोळ्यातून येणारी प्रतिमा मेंदू दाबतो. हे डोळ्यांच्या सभोवतालच्या स्नायूंच्या असंतुलनामुळे होते. काहींमध्ये तो बालपणात डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळेदेखील होऊ शकतो, या शिवाय इतरही कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये आजाराचा परिणाम दोन्ही डोळ्यांवर दिसून येतो. यामुळे उद्भवणाऱ्या दृष्टी समस्यांमुळे मुलाला दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
- ‘ॲम्ब्लियोपिया’ची लक्षणे
‘ॲम्ब्लियोपिया’मध्ये प्रभावित डोळ्याकडून स्पष्ट दृश्य आणि मेंदूला स्पष्ट सिग्नल मिळत नाही, ज्यामुळे मुलाचा मेंदू त्याकडे दुर्लक्ष करू लागतो. यात धूसर दृष्टी, दुप्पट दृष्टी, स्क्विंट किंवा एक डोळा बंद करणे ही लक्षणे दिसून येतात.
-प्रत्येक मुलाच्या डोळ्यांची तपासणी गरजेची
मुलांची दृष्टी वाचवायची असेल तर प्रत्येक मुला-मुलीला शाळेत घालण्यापूर्वी त्याची नेत्र तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: वयाच्या तीन वर्षांआधी ही तपासणी करून घेतली पाहिजे. वेळेत उपचार करून ‘ॲम्ब्लियोपिया’सारखा आजार दूर करणे शक्य आहे.
-डॉ. प्रशांत बावनकुळे, ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ