वर्षभरापासून १५वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:22+5:302021-02-27T04:08:22+5:30
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून ...
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद पडलेले मूत्रपिंड प्रत्यारोपण अद्यापही सुरू झालेले नाही. परिणामी, १५ वर रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. धक्कादायक म्हणजे, आरोग्य विभागाकडून दिला जाणारा अवयव प्रत्यारोपणाचा अवधी डिसेंबर २०२०मध्येच संपला. स्मरणपत्र पाठवूनही मंजुरी मिळाली नाही. यामुळे रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यावेळच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ६० रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्या. यामुळे रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. मात्र, मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शासनाने प्रत्यारोपण पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या. नोव्हेंबरपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले. यामुळे डिसेंबर किंवा नव्या वर्षापासून पुन्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या अवयव प्रत्यारोपणाला डिसेंबर २०२०मध्ये ५ वर्षे पूर्ण झाली. यामुळे पुन्हा आरोग्य विभागाकडून प्रत्यारोपणाच्या मंजुरीसाठी नेफ्रोलॉजी विभागाने वारंवार स्मरणपत्र दिले. परंतु आरोग्य विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. या संदर्भातील एक पत्र नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे यांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले आहे.
-मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राला विकासाची गरज
‘सुपर’चे मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र हे नेफ्रोलॉजी विभागामार्फत चालविले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या केंद्राच्या विकासाची गरज आहे. तज्ज्ञानुसार, पूर्णवेळ मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ, युरोलॉजी, नेफ्रोलॉजीसह, आरोग्य अधिकारी, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शिवाय, दोन विशेष कक्षासह आवश्यक अद्ययावत यंत्रसामग्री महत्त्वाची आहे.
-प्रत्यारोपणाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव
दर ५ वर्षांनी अवयव प्रत्यारोपणाला आरोग्य विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्या संदर्भातील प्रस्ताव आतापर्यंत पाचवेळा संबंधित विभागाकडे पाठविला आहे. याची माहिती अधिष्ठात्यांना देण्यात आली आहे.
-डॉ. चारुलता बावनकुळे
प्रमुख, नेफ्रोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल