१६ देशातील ३०० च्यावर कृषी तज्ज्ञ उद्या नागपुरात; लिंबूवर्गीय फळांवर हाेणार मंथन
By निशांत वानखेडे | Published: October 26, 2023 07:27 PM2023-10-26T19:27:47+5:302023-10-26T19:28:06+5:30
पहिली एशियन सिट्रस काॅंग्रेस-२३ उद्यापासून
नागपूर : दि इंडियन साेसायटी ऑफ सिट्रीकल्चर, महाराष्ट्र आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (आयसीएआर) यांच्यावतीने पहिली एशियन सिट्रस काॅंग्रेस-२०२३ शनिवारपासून नागपुरात सुरू हाेत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आशियातील १६ देशांचे ३०० च्यावर कृषीतज्ज्ञ सहभागी हाेणार असून संत्रा, माेसंबी अशा लिंबूवर्गीय फळांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन, संशाेधनावर मंथन हाेईल.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता हाॅटेल सेंटर पाॅइंट येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या सिट्रस काॅंग्रेसचे उद्घाटन हाेणार आहे. याप्रसंगी आयसीएआरचे महासंचालक डाॅ. हिमांशू पाठक, उपमहासंचालक डाॅ. टी. आर. शर्मा, कृषी वैज्ञानिक रिक्रुटमेंट मंडळाचे माजी चेअरमन डाॅ. सी. डी. मायी प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले. थायंलंडची आशिया-पॅसिफीक असाेसिएशन ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट व दक्षिण काेरियाची काेरियन साेसायटी ऑफ सिट्रस अॅण्ड सबट्राॅपिकल क्लायमेट फ्रुट्स या सहयाेगी संस्था आहे.
तीन दिवसीय परिषदेमध्ये आशियायी देशात उत्पादित हाेणाऱ्या लिंबूवर्गीय फळांच्या विविध प्रजातींचे उत्पादन, संवर्धनाबाबत मंथन हाेईल. तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, निर्यात यावर चर्चा हाेणार आहे. जगात लिंबूवर्गीय फळांच्या एकूण उत्पादनापैकी ५२ टक्के उत्पादन आशियायी देशात हाेते. शेतकरी, प्रक्रिया उद्याेजक, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक उत्पान्नाचे माेठे साधन आहे. या सर्वांचे मिळून आशियायी प्लॅटफार्म तयार करणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचे डाॅ. घाेष यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रधान वैज्ञानिक डाॅ. ए. के. दास, डाॅ. एस. एस. राॅय आदी उपस्थित हाेते.