तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे ‘कवच’च नाही; लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
By नरेश डोंगरे | Published: June 5, 2023 05:53 AM2023-06-05T05:53:32+5:302023-06-05T05:54:36+5:30
लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘कवच’च शेकडो रेल्वेगाड्यांना लावण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारतीय रेल्वेतील ‘क्रांती’ म्हणून प्रचंड गाजावाजा झालेल्या ‘कवच’ टेक्नॉलॉजीला रेल्वेने गुंडाळून ठेवले की काय, असा संतप्त प्रश्न चर्चेला आला आहे. लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘कवच’च शेकडो रेल्वेगाड्यांना लावण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
भारतीय रेल्वेचा अलीकडच्या काळातील सर्वांत भीषण अपघात ओडिशातील बालासोरमध्ये २ जूनच्या रात्री घडला. तेव्हापासून या अपघाताची कारणमीमांसा चर्चेला आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर झोनमधून चालणाऱ्या तीनशेवर रेल्वेगाड्यांमध्येे ‘सुरक्षा कवच’ नसल्याचे अर्थात लाखो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालून या रेल्वेगाड्या चालविल्या जात असल्याचे धक्कादायक आणि संतापजनक वास्तव चर्चेला आले आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या १४४५ किलोमीटर रूटवर धावणाऱ्या ७७ रेल्वेगाड्यांमध्ये तसेच दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडोरमध्ये कवच सिस्टीम लावण्याचे काम सुरू आहे. अनेक गाड्यांमध्ये ते अजूनही लागलेले नाही.
काय असते कवच टेक्नॉलॉजी?
- रेल्वेगाड्या एकमेकांवर धडकण्याचा धोका टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने कवच टेक्नॉलॉजी रिसर्च डिझाइन ॲन्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) सोबत मिळून विकसित केली होती.
- ‘कवच’ची कमांड थेट रेल्वेगाडीचे इंजिन आणि रेल्वेलाइनशी कनेक्ट होते. त्यामुळे दोन रेल्वेगाड्या कितीही वेगात एकाच पटरीवरून समोरासमोर (परस्परविरोधी दिशेने) धावत येत असल्या तरी त्या एकमेकांवर धडकणार नाहीत.
- दोन्ही गाड्यांच्या इंजिनमध्ये असलेले ट्रान्समीटर पटरी (रूळ) कनेक्टिव्हिटीमुळे कवच लोकेशन ट्रेस करेल आणि रेल्वेगाडीचे इंजिन साडेतीनशे ते चारशे मीटर दूरच दोन्ही गाड्यांना ऑटोमेटिक थांबवून देईल. गाड्यांना कवच असले आणि चुकून ट्रेनने सिग्नल जंपिंग केले तरी, धोक्याचा इशारा मिळेल आणि तेथून ५ किलोमीटरच्या परिसरातील दुसऱ्या रेल्वेगाड्यांची हालचाल बंद होईल.
कधी झाली ट्रायल?
- पहिली – २०१६
- दुसरी - मार्च २०२२
- दुसऱ्या चाचणीवेळी एका गाडीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि दुसऱ्या गाडीत खुद्द रेल्वे बोर्डाचे चेअरमन बसले आणि या दोन्ही गाड्या एकाच पटरीवर समोरासमोर चालविण्यात आल्या. मात्र, ‘कवच’ टेक्नॉलॉजीमुळे या दोन्ही गाड्या एकमेकांवर न धडकता ३८० मीटर दूर आपोआप थांबल्या.
अधिकारी म्हणतो, म्हणून मृत्यूचा घाला...
नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर झोनमधून धावणाऱ्या ३४९ रेल्वेगाड्यांत तर देशातील विविध भागांत धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ही अत्यंत महत्त्वाची अन् अत्यावश्यक ‘कवच सिस्टीम’ लावण्यात आलेली नाही. त्याचमुळे ओडिशात रेल्वेगाड्यांचा भयावह अपघात होऊन तीनशेच्या आसपास निर्दोष व्यक्तींवर मृत्यूने घाला घातला.