पेंचच्या ‘अंडरपास’मधून गेले ५००० वर प्राणी; सर्वाधिक हरीण तर वाघाने केला तब्बल १५१ वेळा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:54 AM2020-10-14T01:54:45+5:302020-10-14T06:53:30+5:30
वन्यजीव संस्थेचा अहवाल : या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : पेंच अभयारण्यामधून जाणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वन्यप्राण्यांचा अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेले अंडरपास वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणाºया वाहनांखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना नेहमीच घडत टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटरच्या क्षेत्रात २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल व पाच अंडरपास तयार करण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी केली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. यामधून प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने ७८ कॅमेरे लावले आहेत. यातून वन्यप्राण्यांची तब्बल १ लाख ३२ हजार ५३२ छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. संस्थेच्या अहवालानुसार सर्व अंडरपासमधून ५,२९५ वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे.
या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रानडुकरे ७०८ वेळा, ससे ३३९ वेळा, रानमांजर २३६ वेळा, रानकुत्र्यांनी २८१ वेळा अंडरपासचा वापर करून रस्ता ओलांडल्याचे अहवालात नमूद आहे. यांसह नीलगाय, सांभर, गौर, मुंगूस, साळिंदर, वाघाटी, उदमांजर, कोल्हे, बिबट अशा एकूण १७ प्रजातींनी अंडरपासचा उपयोग करून रस्ता ओलांडला.
कॅम्पातर्फे ३.५० कोटी : वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याविषयी अभ्यासाची जबाबदारी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली. याअंतर्गत कॅम्पातर्फे साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पेंचचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी दिली.