५००० वर प्राण्यांनी केला पेंच अभयारण्याच्या अंडरपासचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:42 AM2020-10-14T11:42:37+5:302020-10-14T11:44:43+5:30

Pench Sanctuary Nagpur News गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.

Over 5,000 animals used the underpass of Pench Sanctuary | ५००० वर प्राण्यांनी केला पेंच अभयारण्याच्या अंडरपासचा वापर

५००० वर प्राण्यांनी केला पेंच अभयारण्याच्या अंडरपासचा वापर

Next
ठळक मुद्देसर्वाधिक हरीण, वाघाने केला १५१ वेळा वापर वन्यजीव संस्थेचा अहवाल

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच अभयारण्यामधून जाणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वन्यप्राण्यांचा अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल अंडरपास वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटरच्या क्षेत्रात २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल व पाच अंडरपास तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. या अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गावर ही समस्या कायम होती. यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वाघ आणि बिबट्यांची संख्या मोठी आहे. वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा याकरिता हे अंडरपास बनविण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी केली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. यामधून प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने ७८ कॅमेरे लावले आहेत. यातून वन्यप्राण्यांच्या तब्बल १ लाख ३२ हजार ५३२ छायाचित्र टिपण्यात आले आहेत. संस्थेच्या अहवालानुसार सर्व अंडरपासमधून ५२९५ वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे.

या अंडरपासचा सर्वाधिक ३३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रानडुक्कर ७०८ वेळा, ससे ३३९ वेळा, रानमांजर २३६ वेळा, रानकुत्र्यांनी २८१ वेळा अंडरपासचा वापर करून रस्ता ओलांडल्याचे अहवालात नमूद आहे. यांसह नीलगाय, सांबर, गौर, मुंगूस, साळींदर, वाघाटी, उदमांजर, कोल्हे, बिबट अशा एकूण १७ प्रजातींनी अंडरपासचा उपयोग करून रस्ता ओलांडला.

कॅम्पातर्फे ३.५० कोटी
वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याविषयी अभ्यासाची जबाबदारी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली. याअंतर्गत कॅम्पातर्फे साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पेंचचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी दिली. याअंतर्गत वाघांसाठी पायवाट करणे, रस्त्याचे बॅरिकेड काढण्यात यावे, चेकपोस्ट तयार करणे, फेन्सिंग, अंडरपासच्या पिलरना कॅमाफ्लॉज (जंगली रंग) देणे, पाणवठे तयार करणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title: Over 5,000 animals used the underpass of Pench Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.