अचलपुरात साखरपुड्याच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा; ६०च्या वर रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 11:49 AM2022-12-05T11:49:09+5:302022-12-05T11:53:36+5:30
अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार
नागपूर/अमरावती : अष्टमासिद्धी येथील मंगल कार्यालयात २ डिसेंबर रोजी झालेल्या साखरपुड्याच्या जेवणातून अनेक जणांना दोन दिवसांनंतर विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी उजेडात आली. ६०च्या वर रुग्णांना उलट्या, मळमळ, हगवण, पोटदुखीचा त्रास झाल्याने रविवारी दुपारी ४ पासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. अनेक नागरिक परतवाडा, अचलपूर, नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. लहानग्यांपासून वृद्धांचा समावेश रुग्णांमध्ये आहे.
अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील माजी नगर उपाध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या मुलीचा साखरपुडा २ डिसेंबर रोजी अष्टमासिद्धी येथील मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. जीवनपुरा येथील ८००च्या वर नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली व जेवणाचा आनंद घेतला. ३ डिसेंबरपासून अनेकांना मळमळ, हगवण, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ४ डिसेंबरपासून हा त्रास खूप वाढला. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालय गाठले, तर अनेक जण उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. रात्रीपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ६० हून अधिक नागरिकांवर उपचार सुरू होता.
यांचा आहे समावेश
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रघुनाथ बीजेवार (७५), शालिक विजयवार (७१), इंद्राबाई गंगभोज (५५), अमोल मेटकर (४४), तुषार गणेश बेदरे (२८), अर्चना वरेकर, सविता वानखडे, यश पवार (१०), नजीर शाह रहमान शाह, प्रकाश रामराव कावरे (६५), मंगेश वऱ्हेकर (४०), ओम वऱ्हेकर (११), दर्शन बोडके (१७), लता राजकुमार देवरे, मितल डिवरे, कोकिळा खोडे (४६), दिलीप पवार (४८), जान्हवी देवरे, विजय कराळे, मधुकर आंबेकर, रुक्मिणी चावरे (४५), रोशनी राहुल शेंद्रे (२७), मीना सुरेश राऊत (५५), बंटी बाबू पिंपळे (१९), ओम संजय पांडे (१४), दीपक श्रीराम घाटे (४०), गजानन सावरकर (१७), अलका बेद्रे (५५), प्रीती बेद्रे (२२), गजानन तायडे (५५), राजा भुसूम (२४), पूजा पांडे (२१), इंदिरा पांडे (४५), अंकिता पिंपळे (१७) भूषण पिंपळे (२०), सविता पिंपळे (५०), दीपक पिंपळे (२६), राम पिंपळे (२०), रोशनी पिंपळे (३५), श्रद्धा पिंपळे (१२), इशिता पिंपळे (७), रिशिका धर्मेंद्र पिंपळे (१७), संगीता दिवटे (२१), रोहन दिवटे (७) या रुग्णांचा समावेश आहे. आणखी रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणे सुरूच असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना डॉक्टर प्रवीण मोरले, चेतन पायरले, प्रियांका कांबळे, तेजस कन्नाके, दीपाली जाधव रुग्णसेवा देत आहेत. विषबाधा पाण्यातून किंवा अन्नातून होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.