नागपूर ग्रामीण भागातील ६ हजारावर ग्रामस्थांनी डाऊनलोड केले 'आरोग्य सेतू अॅप'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:38 PM2020-04-17T23:38:47+5:302020-04-17T23:39:52+5:30
कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनासंदर्भात अनेक प्रकारची दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असते. कोरोनाविषयी अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून नागपूर ग्रामीण भागातील सहा हजार लोकांनी आतापर्यंत हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ मोबाईल अॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे माहिती पडते. या अँपमध्ये मोबाईल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो, ज्यावेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्यावेळी हे अॅप युजर्सना अलर्ट करते. हे अॅप अँड्रॉईड व आयफोन या दोन्ही व्हर्जनवर आहे. या अॅपमध्ये कोरोनाची लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सेंटर नंबर दिले आहेत. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा, तसेच दुसऱ्यांनाही डाऊनलोड करण्यास सांगा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.