वर्षभरात बँकांमध्ये झाले ६७ हजार कोटींचे घोटाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:18 AM2019-09-12T00:18:29+5:302019-09-12T00:19:11+5:30
देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती. आश्चर्याची बाब म्हणजे यातील हजार कोटींचे घोटाळे तर बँक कर्मचाऱ्यांनीच केले होते. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये एकूण किती घोटाळे झाले, यात किती रकमेचा समावेश होता, किती घोटाळ्यात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश होता, ‘सायबर’ घोटाळ्यांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये झालेले एकूण ५९ हजार ८२६ घोटाळे उघडकीस आले. यात ६७ हजार ४२३ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.
कर्मचाऱ्यांवरील कारवाईची माहितीच नाही
बँकामधील एकूण गैरव्यवहारांपैकी ४ हजार २६९ घोटाळ्यांमध्ये बँकांच्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष समावेश होता. ही रक्कम १ हजार १४ कोटी ९७ लाख इतकी होती. परंतु या कर्मचाऱ्यांवर नेमकी कुठली कारवाई करण्यात आली याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही.
‘एटीएम कार्ड’शी संबंधित १९ हजार घोटाळे
दरम्यान, ‘एटीएम कार्ड’, ‘क्रेडिट कार्ड’ व ‘इंटरनेट बँकिंग’शी संबंधित एकूण ५० हजार ५४७ घोटाळे समोर आले. यात ग्राहकांचे १४५ कोटी ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. एकट्या ‘एटीएम कार्ड’शी संंबंधित १९ हजार ८१८ घोटाळ्यांचा समावेश होता व यात ५८ कोटी ३८ लाखांची रक्कम गायब झाली. ‘इंटरनेट बँकिंग’शी संंबंधित ५ हजार २५८ घोटाळे समोर आले व १६ कोटी ९४ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही रक्कम ग्राहकांना परत करण्यात आली की नाही याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ‘सायबर’ गुन्हे वाढीस लागले असता बँकेकडे याची वेगळी आकडेवारीदेखील नाही.
अशी आहे ‘कार्ड’ घोटाळ्याची आकडेवारी
घोटाळा एकूण संख्या रक्कम (कोटींमध्ये)
डेबिट कार्ड्स १९,८१८ ५८.३८
क्रेडीट कार्ड्स २५,४७१ ६९.७६
इंटरनेट बँकिंग ५,२५८ १६.९४