रेकॉर्ड ब्रेक लसीकरण; जिल्ह्यात ७६ हजार लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 12:00 PM2021-12-01T12:00:46+5:302021-12-01T12:08:48+5:30

मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. तब्बल ७६ हजार १८२ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. शहरात ४३ हजार ८६८, तर ग्रामीण भागात ३२ हजार ३१४ लोकांनी लस घेतली. 

over 76 thousand people vaccinated on 30 november in nagpur district | रेकॉर्ड ब्रेक लसीकरण; जिल्ह्यात ७६ हजार लोकांनी घेतली लस

रेकॉर्ड ब्रेक लसीकरण; जिल्ह्यात ७६ हजार लोकांनी घेतली लस

Next
ठळक मुद्दे‘ओमायक्रॉन’च्या संकटात दिलासादायक बातमी

नागपूर : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’चा धोका लक्षात घेऊन भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या चिंतेच्या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले. तब्बल ७६ हजार १८२ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

कोरोनावरील लसीकरणाला जानेवारीपासून सुरुवात झाली असली तरी जूनपासून लसीकरणाला वेग आला. परिणामी, लसीकरणात पहिल्या १५ जिल्ह्यांत नागपूर जिल्हा १२व्या स्थानी आला. येथील ८८.३४ टक्के लोकांनी पहिला डोस, तर ४८.८८ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला. मिशन कवचकुंडल, मिशन युवा स्वास्थ्य व रात्रीचे लसीकरण अशा विविध अभियानांमुळे लसीकरणाची गती वाढली आहे. यात भर पडली मंगळवारी झालेल्या ७६ हजार १८२ लसीकरणाची. शहरात ४३ हजार ८६८, तर ग्रामीण भागात ३२ हजार ३१४ लोकांनी लस घेतली. 

नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक, ८ लाख लसीकरण

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण नोव्हेंबर महिन्यात झाले. ८ लाख २० हजार ३६९ लोकांनी लस घेतली. विशेष म्हणजे, लसीकरणाला सुरुवात झालेल्या जानेवारी महिन्यात १३ हजार ४३६ लोकांनी लस घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ५० हजार ९४६, मार्च महिन्यात ३ लाख ७८ हजार ३२०, एप्रिल महिन्यात ६ लाख १८ हजार २०७, मे महिन्यात २ लाख ९१ हजार ३७५, जून महिन्यात ३ लाख ८५ हजार १५३, जुलै महिन्यात ७ लाख ६४ हजार ५४५, ऑगस्ट महिन्यात ५ लाख ७७ हजार ३५२, सप्टेंबर महिन्यात ६ लाख ५७ हजार ८५९ तर, ऑक्टोबर महिन्यात ७ लाख ३० हजार २७४ लोकांनी लस घेतली.

शहरात ३० लाख डोसचा टप्पा पार

जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने मंगळवारी ३० लाख डोसचा टप्पा पार केला. आतापर्यंत शहरात ३० लाख ६० हजार कोविड लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. १९.७३ लाख पात्र नागरिकांमधून १९ लाखांहून अधिक पहिला आणि ११ लाखांच्या वर दुसरा डोस देण्यात आला आहे.

Web Title: over 76 thousand people vaccinated on 30 november in nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.