चार वर्षात धावत्या रेल्वेने घेतला सातशेवर जणांची बळी; चार वर्षांची धक्कादायक आकडेवारी
By नरेश डोंगरे | Published: May 6, 2023 06:47 PM2023-05-06T18:47:43+5:302023-05-06T18:48:31+5:30
Nagpur News अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.
नागपूर : अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.
गेल्या वर्षी रेल्वेची धडक बसल्यामुळे, रेल्वे खाली झोकून दिल्यामुळे, कुणाला रेल्वे समोर ढकलून दिल्यामुळे तर कुणाचा तोल जाऊन पडल्यामुळे एकूण २९८ जणांचा बळी गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सन २०२० ते २०२३ पर्यंत चार वर्षाची माहिती पुढे आली. त्यातून उघड झालेला मृत्यूचा आकडा धक्कादायक आहे.
सन २०२० मध्ये विविध कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची संख्या १५५ आहे. २०२१ मध्ये १९० जणांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये हा आकडा २९८ वर पोहोचला. २०२३ मार्च अखेर पर्यंत नागपूर विभागात तब्बल ६५ व्यक्तींचा रेल्वेमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. गेल्या चार वर्षातील ही आकडेवारी बघता रेल्वेने ठार होणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.
रेल्वे लाईन ओलांडताना सर्वाधिक मृत्यू
रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या रेल्वेशी संबंधित प्रकरणात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचे नमूद आहे. रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५७ आहे. त्यातील २०२० आणि २०२१ ला प्रत्येकी ४६ असे एकूण ९२ मृत्यू झाले. २०२२ मध्ये ५३ जणांचे तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १२ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.
११० जणांची आत्महत्या
रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देऊन चार वर्षांत ११० जणांनी आत्महत्या केली. त्यात २०२० मध्ये २७, २०२१ मध्ये २९, २०२२ मध्ये ४४ तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १० जणांनी आत्महत्या केल्याचे रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई-पुण्यासारखी स्टंटबाजी नाही
मुंबई, पुण्याकडे रेल्वेतून स्टंटबाजी करताना अपघात घडतो आणि अनेक जण त्यात प्राण गमावतात. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अशा प्रकारची एकही घटना घडलेली नाही. नागपूर जिल्ह्यात रेल्वेतून कुणी स्टंटबाजी करताना अपघात झाल्याची नोंद नाही.