गेल्या वर्षभरात ‘चॉईस नंबर’साठी मोजले तब्बल २ कोटी ७३ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 07:00 AM2022-04-19T07:00:00+5:302022-04-19T07:00:05+5:30
Nagpur News गेल्या वर्षभरात ३ हजार ५४१ वाहन चालकांनी ‘चॉईस नंबर’ घेतल्याने नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) तब्बल २ कोटी ७३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला.
सुमेध वाघमारे
नागपूर : आपल्या वाहनाचा नंबरप्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा ‘चॉईस नंबर’ जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा समज अनेकांचा असतो. यामुळे गेल्या वर्षभरात ३ हजार ५४१ वाहन चालकांनी ‘चॉईस नंबर’ घेतल्याने नागपूर शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) तब्बल २ कोटी ७३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला.
वाहनांना आकर्षक नंबर देण्याचे ‘फॅड’ नवे नाही. गाडीला ठराविक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ही बाब परिवहन विभागाने आपल्या पथ्यावर पाडून घेत, २०१३ मध्ये ‘चॉईस नंबर’च्या शुल्कात तीन ते चार पट वाढ केली. ‘चॉईस नंबर’महागल्याने वाहनधारक याकडे पाठ फिरवतील, असा काहींचा समज होता. सुरुवातीचे दोन वर्ष तसे चित्र होते. परंतु नंतर ते बदलत गेले. मागील वर्षी कोरोना असल्याने एप्रिल व मे महिन्यात कमी नंबर गेले. परंतु तिसरी लाट ओसरताच वाहनांच्या विक्रीतही वाढ होऊन चॉईस नंबर घेणाऱ्यांची संख्याही वाढली. विशेषत: ग्रामीण भागातही याचे ‘फॅड’ वाढत चालले आहे.
‘०००१’नंबर आवाक्याबाहेरच
पूर्वी ‘०००१’ नंबर हा लाख रुपयात मिळायचा. वाहनाची नवीन सिरिज सुरू होताच अनेक वाहनधारक हा नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे. परंतु आता तो शहरात चार लाखाचा तर ग्रामीण भागात तीन लाख रुपयाचा झाला आहे. यामुळे तिन्ही आरटीओ कार्यालयात या नंबराला ग्राहक मिळालेला नाही. मिळणार की नाही, यावर शंकाही उपस्थित केली जात आहे.
-‘डीलर’मुळे वाढली स्पर्धा
पूर्वी ‘आरटीओ’ कार्यालयातूनच नंबर दिले जायचे. त्यातही कमी आकर्षक नंबर अधिकाऱ्यांच्या ओळखीने सहज मिळायचे. परंतु आता वाहन ‘डीलर’कडूनच वाहनाला नंबर पडत असल्याने, त्यातही कोणता नंबर पडेल याची शाश्वती नसल्याने, ‘चॉईस’ नंबर घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
- शहरला दीड लाख तर, ग्रामीणला सव्वा लाखाचा महसूल
नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत १ हजार ५९९ वाहनांनी ‘चॉईस’चे नंबर घेतले असून, यातून १ कोटी ५० लाख रुपयाचा महसूल मिळाला आहे. तर, नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातून १ हजार ९४२ वाहनांची ‘चॉईस’चे नंबर घेतले आहेत. यातून १ कोटी २३ लाख ३८ हजार ५०० रुपयाचा महसूल मिळाला आहे.
- आता ग्रामीणमधूनही मिळतो प्रतिसाद
पूर्वी शहरातूनच ‘चॉईस’ नंबरला मोठी मागणी असायची. परंतु आता ग्रामीणमधूनही या नंबरला मागणी वाढत आहे. यामुळे ग्रामीण आरटीओ कार्यालयाला वर्षभरातच १ कोटी २३ लाख ३८ हजार ५०० रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे.
- डॉ. बजरंग खरमाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण