अडीचशेवर कामगारांच्या घामाचा पैसा अडकला; अर्बन क्रेडिट सोसायटीतील व्यवस्थापकाच्या घोळाचा फटका
By योगेश पांडे | Published: January 23, 2023 05:36 PM2023-01-23T17:36:20+5:302023-01-23T17:37:15+5:30
सोसायटीकडून कागदपत्रांची मागणी, कामगार हतबल
नागपूर : दिवसभर घाम गाळून मुलांच्या भविष्यासाठी बचत करण्यासाठी कळमन्यातील शेकडो कामगारांनी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत डेली कलेक्शनचे खाते उघडले. मात्र, गरजेच्या वेळी अनेकांचे पैसे त्यात अडकले आहेत. संबंधित सोसायटीतील व्यवस्थापकाने केलेल्या घोळाचा फटका खातेदारांना बसतो आहे. सोसायटीकडून कामगारांना अधिकृत कागदपत्रे मागण्यात येत असून, व्यवस्थापक फरार आहे. अशा स्थितीत मेहनतीची कमाई बुडणार का, अशीच चिंता कामगारांना सतावते आहे.
कळमन्यातील अनेक कामगारांनी नंदनवन येथील चंद्रभागा महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत डेली कलेक्शनअंतर्गत पैसे गुंतवायला सुरुवात केली. दोनशेहून अधिक कामगारांचा यात समावेश होता. यासाठी सोसायटीने एजंट्सदेखील नेमले होते. मात्र, ज्यावेळी कामगारांना पैसे घेण्याची गरज पडली, त्यावेळी सोसायटीत समस्या सुरू आहेत व सध्या पैसे काढता येणार नाही असे उत्तर देण्यात आले.
दोनदा सोसायटीत जाऊनही पैसे देण्यास टाळाटाळ
कामगारांनी काही दिवस प्रतीक्षा केली. त्यानंतर दोनदा कामगार सोसायटीत गेले. मात्र, त्यानंतरदेखील सोसायटीकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याशिवाय अधिकाऱ्यांनीदेखील भेटण्यास नकार दिला. संतप्त कामगारांनी काही एजंट्ससह नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दिली आहे. अडीचशेहून अधिक कामगारांचे ७५ लाख रुपये अडकले असून, प्रत्यक्षात असे आणखी खातेधारक असून ही रक्कम जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुनीता ठाकरे यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.
सोसायटीची भूमिका, अधिकृत नोंदी तपासणे गरजेचे
यासंदर्भात सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डोर्लीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी एजंट्सने केलेले डेली कलेक्शन तपासावे लागेल, अशी भूमिका मांडली. सोसायटीतील माजी व्यवस्थापक विजय चन्ने याने हा घोळ केला आहे. त्याने अनेक नोंदी केलेल्याच नाहीत. सोसायटीला या प्रकाराची माहितीच नव्हती. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारदेखील करण्यात आली आहे. आम्हाला डेली कलेक्शनचे पासबुक व स्टेटमेंट तपासावे लागतील. त्यानंतरच पैसे देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. काही एजंट्स जाणूनबुजून गोंधळ घालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी लावला.
खातेदार हवालदिल
या प्रकरणात एका व्यवस्थापकाने घोळ केला व त्याचा फटका खातेधारकांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जास्त व्याज मिळेल या आशेवर कामगारांनी डेली कलेक्शनमध्ये पैसे गुंतविले. मात्र, सोसायटीत संबंधित व्यवस्थापकाने आवश्यक नोंदीच केल्या नाहीत. याशिवाय त्याने विविध माध्यमातून घोळ घातले. ही रक्कम एक कोटीहून अधिक आहे. ज्यावेळी खातेधारक पैसे मागायला गेले, तेव्हा अनेकांकडे अधिकृत स्टेटमेंट नव्हते. सोसायटीने त्यांना त्याची मागणी केली. सोसायटीने खातेधारकांचे पैसे कर्जाच्या रूपात दिले व त्याची रिकव्हरी झालेली नाही. यामुळे पैसे देता येत नसल्याचे अधिकारी सांगत असल्याचा आरोप खातेधारकांनी केला आहे.